Pune PMC Elections | महापालिकेच्या तिजोरीची लूट करणाऱ्यांना यंदा कसबा-सोमवार-रास्ता पेठेतील नागरिक राजकारणातून ‘हद्दपार’ करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश नवथरे यांची भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर जोरदार टीका
पुणे : Pune PMC Elections | प्रभागातील समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनुभवींच्या हाती महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देण्यास प्रभागातील नागरिकांनी मागील निवडणुकीत नकार दिला होता. यानंतरही भाजपने याला मागील दरवाज्याने प्रवेश देऊन सभागृह नेता बनवत पुणेकरांच्या तिजोरीची लूट केल्याचा आरोप गणेश नवथरे यांनी केला आहे. अशांना प्रभागातील जनतेने यंदा राजकारणातून ‘हद्दपार’ करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्र. २४ कसबा गणपती – कमला नेहरू रुग्णालय – के.इ. एम. रुग्णालय प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश नवथरे यांनी सोमवारी प्रचार फेरी दरम्यान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश नवथरे, माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी, प्रकाश फुलावरे आणि पूनम काळोखे यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली होती. प्रचारफेरीला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील ड गटातील उमेदवार गणेश नवथरे यांनी भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्यावर जोरदार टीका करताना बिडकर यांचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतानाच प्रभागातील पाणी, कचरा, जुन्या वाड्यांच्या समस्या, वाहतूक कोंडी, वाढती व्यसनाधिनता, बेरोजगारी आदी समस्यांचा पाढा वाचला.
नवथरे म्हणाले, माझी लढाई प्रस्थापितांविरोधात आहे. मागील अनेक वर्षात केवळ महापालिकेच्या तिजोरीला भोक पाडून पुणेकरांचा पैसा लुटण्याचा एककल्ली कार्यक्रम नगरसेवकांनी केला आहे. पक्ष यांना केवळ पैसे छापण्याची मशीन म्हणून उमेदवारी देत आहे. याचा परिणाम शहराच्या विकास कामांवर होत आहे. नागरिक दिवसेंदिवस समस्यांच्या खाईत लोटले जात आहेत. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाची तर गोष्ट निराळीच आहे. महापालिकेतील पद असेल तरच महापालिकेत जाणारा नगरसेवक. विरोधी पक्षात असतानाही स्थायी समितीचे अध्यक्षपद, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मागील दाराने स्वीकृत नगरसेवक होऊन सभागृह नेते पद ही केवळ अनुभव असलेल्यानांच मिळविता येतात.
सर्व सामान्य कार्यकर्त्यांना आई, बहिणीवरून शिवीगाळ करून त्यांच्या अनेक वर्षांच्या पक्षनिष्ठेचे मातेरे करणाऱ्या अशांना यंदा राजकारणातूनच हद्दपार करण्यासाठी भाजप सह सर्व पक्षीय आणि मंडळांचे कार्यकर्ते यंदा माझ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष व फोनवरून मोठा पाठिंबा मिळत असून यंदा कसब्यातून केवळ प्रामाणिक काम करणारा माझ्या सारखा कार्यकर्ताच महापालिकेत निवडून जाईल अशी ग्वाही देत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंबा आणि आशीर्वाद यामुळे माझा व माझ्या सहकारी उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास नवथरे यांनी यावेळी व्यक्त केला.
