Pune PMC Elections | बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार – सनी विनायक निम्हण
पुणे : Pune PMC Elections | अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज आहे. बोपोडी परिसरात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, या भागात महापालिकेचे दोन दवाखाने आहेत त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल असा विश्वास भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी बोपोडीकरांना दिला.
आज भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण , परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांची पदयात्रा बोपोडी परिसरात काढण्यात आली यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदारांशी संवाद साधताना चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण म्हणाले, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बोपोडीतील नागरिकांना पिंपरीतील वाय.सी.एम हॉस्पिटल,खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते आणि या भागात असलेला शेवाळे दवाखाना सध्या कार्यरत असला तरी त्यामध्ये सोई सुविधा अभाव असून तिथे फक्त ओपीडी आहे,खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोई सुविधांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल तर संजय गांधी दवाखाना जो सध्या बांधून तयार आहे परंतु सुरू झालेला नाही तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेनेसुरू करू.बोपोडीच्या नागरिकांची आरोग्यसेवा बळकट करू असे निम्हण यांनी सांगितले.
