Pune PMC Elections | ‘विजय भारतीय जनता पक्षाचाच’; प्रभाग 26 मधील जनसंवाद पदयात्रेत ऐश्वर्या थोरात यांचा ठाम विश्वास (Video)
पुणे : Pune PMC Elections | पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेली ‘जनसंवाद’ पदयात्रा उत्साहात पार पडली. घोरपडे पेठ, गुरुवार पेठ आणि समताभूमी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. या प्रतिसादामुळे प्रभागातील वातावरण भाजपमय झाल्याचे चित्र दिसून आले.
शिवांजली मंडळ (काची आळी) येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर फुलवाला चौक, शिवतेज मित्र मंडळ, कृष्णाहट्टी चौक आणि किराड गल्ली या प्रमुख मार्गांवरून पदयात्रा मार्गस्थ झाली. प्रत्येक चौकात स्थानिक गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने उमेदवारांनी विविध मंडळांच्या आरतीला उपस्थित राहून श्रीगणेशाचे आशीर्वाद घेतले.
या पदयात्रेदरम्यान सामाजिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देत अभिवादन करण्यात आले. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे क्रांतिगुरूंना नमन करण्यात आले, तर फुले वाड्यात महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. समताभूमी येथे पदयात्रेचा समारोप झाला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, प्रभाग २६ मध्ये भाजपचे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील. अजय खेडेकर, स्नेहा माळवदे, विष्णू हरिहर आणि युवा उमेदवार ऐश्वर्या सम्राट थोरात यांना नागरिकांचा ठाम पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उमेदवारांनीही नागरिकांच्या डोळ्यांतील विश्वास आणि मिळालेले प्रेम हेच आपल्या कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त केली. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे उमेदवारांसह नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. उच्चशिक्षित व तरुण उमेदवार म्हणून ऐश्वर्या थोरात यांनी व्यापक दृष्टिकोनातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, कार्यकर्त्यांचा त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे या पदयात्रेतून स्पष्ट झाले.
