Pune PMC Elections | प्रभागाच्या विकासात महिलांची भूमिका केंद्रस्थानी; तृप्ती भरणे यांचे मत

Pune PMC Elections | Women's role is central in ward development; Trupti Bharane's opinion

पुणे: Pune PMC Elections |  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०४ (खराडी-वाघोली) मधील भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांनी शुक्रवारी (ता. ०९) सकाळी व संध्याकाळी विविध भागांत पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या पदयात्रेची सुरुवात सकाळी चव्हाण नगर येथून झाली. त्यानंतर पदयात्रा दिनकर पठारे वस्ती, एनईआय परिसर, शिवराज चौक मार्गे पुढे जात हनुमान व्यायाम शाळा येथे सकाळच्या सत्राचा समारोप झाला. संध्याकाळच्या सत्रात पदयात्रेची सुरुवात एकनाथ पठारे वस्ती येथून झाली. पुढे चौक दत्त मंदिर, महागणपती वडेवाले, अष्टविनायक नगर, त्रिमूर्ती चौक, समता सोसायटी, नागपाल रोड मार्गे ही पदयात्रा पुढे जात अखेरीस मातोश्री सोसायटी येथे समाप्त झाली.

पदयात्रे दरम्यान बोलताना क गटातील उमदेवार तृप्ती संतोष भरणे म्हणाल्या की, “महिलांचा सहभाग एकूणच विकासाच्या निर्णय प्रक्रियेतही वाढला पाहिजे. संधी मिळाल्यास महिलांच्या नेतृत्वातून अधिक संवेदनशील, पारदर्शक व लोकाभिमुख विकास घडवता येतो. प्रभागाच्या विकासात महिलांचीही भूमिका केंद्रस्थानी राहील.”

दरम्यान, ड गटातील उमेदवार सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनता यांचा समन्वय साधूनच विकासाचा आराखडा यशस्वी होतो. नागरिकांचा सहभाग हा विकासाचा कणा असून त्यांच्या सूचनांनुसार काम करण्याचा आमचा निर्धार आहे.”

या पदयात्रेत उमेदवार शैलजीत जयवंत बनसोडे (अ गट), रत्नमाला संदीप सातव (ब गट) तृप्ती संतोष भरणे (क गट) व सुरेंद्र बापूसाहेब पठारे (ड गट) सहभागी होते. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत विविध प्रश्न व सूचना मांडल्या. उमेदवारांनी त्या लक्षपूर्वक ऐकून घेत येत्या काळात ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पदयात्रेमुळे प्रभाग क्रमांक ०४ मध्ये विकासकेंद्रित संवादाला अधिक चालना  मिळाली असून नागरिकांचा वाढता विश्वास व सहभाग उमेदवारांसाठी बळ देणारा ठरत आहे.