Pune PMC News | समाविष्ट 32 गावातून 16 नगरसेवक महापालिकेत ! गावांचा संतुलित विकास करण्याची नगरसेवकांना आणि राजकीय पक्षांना संधी; महत्वाच्या पदांवर ‘गावकऱ्यांना’ संधी मिळणार ?

Pune PMC News | 16 corporators from 32 villages included in the Municipal Corporation! Corporators and political parties will have an opportunity to ensure balanced development of villages; Will 'villagers' get an opportunity in important positions?

पुणे : Pune PMC News | महापालिकेमध्ये मागील ९ वर्षात ३२ गावांचा समावेश झाला. पी एम आर डी ए आणि महापालिकेच्या माध्यमातून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामांना परवानगी देण्यात आली. तसेच गुंठेवारीतही मोठ्या प्रमाणावर घरे झाली. त्यामुळे या गावातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, ड्रेनेज , पथदिवे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था अद्याप म्हणावी तशी विकसित झालेली नाही. या गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना मोठी संधी आहे. येथे खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.

महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावांचा तर २०२१ मध्ये ३२ गावांचा समावेश झाला आहे. पूर्वी महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या पाच कि.मी. परिसरातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने उभारलेली यंत्रणा आता अपुरी पडू लागली आहे.महापालिका आणि पी एम आर डी ए च्या माध्यमातून ३२ गावांमध्ये बांधकाम परवानग्या देताना पाणी, ड्रेनेज अथवा रस्त्यांचा विचार करण्यात आला नाही. केवळ प्रादेशिक विकास आराखड्यात कागदावर दर्शवण्यात आलेल्या रस्ते गृहीत धरून परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे अस्तित्वात असलेले अरुंद रस्ते, पदपथांचा अभाव, जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित झालेल्या मोडकळीस आलेल्या शाळांच्या आणि आरोग्य केंद्रांच्या वास्तू, अपुरी सांडपाणी व्यवस्था आणि कचऱ्याचे साम्राज्य अशाच गोष्टींमुळे बकालपणा दिसून येत आहे.

महापालिकेच्या माध्यमातून काही गावांचा पाणी पुरवठ्याचा विकास आराखडा तयार करून पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू केले आहे. सुरवातीच्या ११ गावांमध्ये ड्रेनेज लाईन चे काम सुरू झाले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सुविधा सुरू केली आहे. परंतु याला म्हणावी तशी गती अद्याप मिळालेली नाही. याला एकमेव कारण म्हणजे या भागात लोकप्रतिनींचा अभाव. विशेष असे की ११ गावांमधून दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र , भौगोलिक परिस्थिती आणि मिळणारा निधी यामध्ये मोठे अंतर असल्याने त्यांनाही फारशी चमक दाखवणे अशक्य होते.

परंतु आता ही संधी नुकतेच झालेल्या निवडणुकीने निर्माण झाली आहे. ३२ गावातून तब्बल १६ नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष असे की यामध्ये सर्वाधिक १३ नगरसेवक हे भाजपचे या सत्ता पक्षातील असून तीन नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे.

या नगरसेवकांना आपापल्या भागात काम करण्याची मोठी संधी आहे. तसेच विकासाच्या दृष्टीने राजकीय पक्षांना देखील येथे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन पाळेमुळे घट्ट करण्याची संधी आहे.

भाजपने २०१७ च्या महापालिकेतील सत्ताकाळात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते अशी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणणारी पदे प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील नगरसेवकांकडे सोपवली होती. जेथे फारशी विकासाला संधी न्हवती तेथे पदे मिळाल्याने निधी अनावश्यक कामावर खर्च झाला. महापालिकेत प्रथमच एकहाती सत्ता आल्याने विरोधात अनेक काळ घालवलेल्या नगरसेवकांना पदे देऊन भाजपने त्यांचा सन्मान राखला हे त्यामागील प्रमुख कारण होते. पुढे हेच पदाधिकारी खासदार, आमदार झाले.

या बाबीचा विचार केल्यास आता मात्र उपनगरे आणि प्रामुख्याने समाविष्ट ३२ गावांचा विकास करून पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या आणि अपेक्षा ठेवणाऱ्या मतदारांना न्याय देण्यासाठी भाजपने या गावांमधून नगरसेवकांना अधिकाधिक संधी द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

समाविष्ट गावातील ऐरणीवरील प्रश्न

क्रीडांगणे, उद्यानांची निर्मिती.

टँकर मुक्तीसाठी पुरेसा पाणी पुरवठा. (आजमितीला शेकडो टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असून वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये खर्च नागरिक स्वतःच्या खिशातून करत आहेत.)

ड्रेनेज लाईन्सची व्यवस्था.

अंतर्गत रस्त्यांची कामे.

९ गावातील ( देवाची उरुळी, फुरसुंगी वगळल्यानंतर) ड्रेनेज लाईन, एसटीपी च्या कामाची पूर्तता.

दररोज सार्वजनिक स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन.

मोडकळीस आलेल्या शाळा, आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण. याठिकाणी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची व्यवस्था.

मिळकत कराबाबत निर्णय.

You may have missed