Pune PMC News | नागरिकांकडून पैसे मागणार्‍या टँकर चालक, मालकांवर कारवाई करणार; महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा इशारा

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | महापालिकेच्यावतीने शहराच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा करताना टँकर चालक अथवा मालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी करू नये आणि नागरिकांनीही त्यांना पैसे देउ नयेत.  असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी केले आहे. तसेच नागरिकांकडून पैसे घेणार्‍या टँकर चालक, मालकांना ५ हजार रुपये दंड ठोठावण्याचा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

महापालिकेच्यावतीने शहराच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यात पाण्याची मागणी अधिक असल्याची संधी साधत टँकर चालक, मालक नागरिकांकडे पैशांची मागणी करतात. गरजेपोटी काही नागरिक पैसेही देतात परंतू अनेक ठिकाणी वादही होतात. यासंदर्भात तक्रारी आल्याने पाणी पुरवठा विभाग सजग झाला आहे. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी टँकर चालक अथवा मालकाने पैशाची मागणी करू नये व नागरिकांनीही त्यांच्या मागणीस भरीस पडू नये. टँकर चालक अथवा मालकाने पैसे मागितल्यास पाणी पुरवठा विभागाकडे व्हॉटस् अप क्र. ९६८९९००००२ या क्रमांकावर फोटो व पुराव्यांसह पाठवावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

You may have missed