Pune PMC News | राज्य सेवेतील अधिकारी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडील ‘विशेष’ खात्यांचा कार्यभार वाढविला
भारतीय प्रशासकीय सेवेतील अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्याकडील महत्वाची खाती काढली; महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या खातेवाटपावरून चर्चा
पुणे : Pune PMC News | महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी.. यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर वर्णी लागलेले आयएएस अधिकारी प्रजित नायर यांनी पदभार स्वीकारला आहे. नायर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महपाालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या खात्यांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये राज्य शासनाच्या सेवेतील अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे मिळकत कर आकारणी, प्रकल्प आणि माहिती व तंत्रज्ञान विभागासह तब्बल २३ खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. तर उर्वरीत दोन्ही आयएएस अधिकार्यांकडील खात्यांचा कार्यभार कमी करत अनुक्रमे १७ आणि १८ खात्यांचा कार्यभार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
महापालिका निवडणुकीच्यावेळी अगदी वॉर्ड रचनेपासून निवडणूक निकालापर्यंत ‘विशेष’ मेहनत घेतलेले राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी ओमप्रकाश दिवटे हे सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्याकडे यार्पुी पथ विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, भांडार, एस.आर.ए, ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग यांसह २० विभागांचा कार्यभार होता. महापालिका आयुक्तांनी आता त्यांच्याकडे यापुर्वी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे असलेल्या मिळकत कर, माहिती व तंत्रज्ञान आणि प्रकल्प या मोठ्या विभागांसह समाज विकास व समाज कल्याण विभागांसारख्या विभागांचाही कार्यभार सोपविला आहे.
अतिरिक्त आयुक्त (जनराल) पवनीत कौर यांच्याकडील घनकचरा विभाग, सामान्य प्रशासन, भवन रचना विभाग, अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंडई विभागाचा कारभार नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर त्यांच्या विभागाकडे पुर्वी असलेला बांधकाम विभाग, ड्रेनेज व एसटीपी प्रकल्प, सुरक्षा, अतिक्रमण निर्मुलन, नगरसचिव विभाग हे पवनीत कौर यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. या बदलांमध्ये पवनीत कौर यांच्याकडील तब्बल चार महत्वाची खाती कमी करण्यात आली आहेत.
