Pune PMC News | महापालिकेच्या तब्बल 4 हजार 188 मिळकतींची प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही; नगरसेविका तन्वी दिवेकर यांची नोंदी करण्यासाठी निवृत्त महसुल अधिकारी नेमण्याची मागणी
पुणे : Pune PMC News | महापालिकेच्या ताब्यात असलेल्या तब्बल ४ हजार १८८ मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेच्या मालकीची नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांची यादी असलेले महापालिकेचे संकेतस्थळही मागील तीन वर्षांपासून बंद आहे. या मिळकतींवर अतिक्रमण होण्याचा धोका आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असा प्रस्ताव नगरसेविका तन्वी दिवेकर यांनी स्थायी समितीला दिला आहे.
नगरसेविका तन्वी दिवेकर यांनी प्रशासनाकडून प्रश्नोत्तराअंतर्गत महापालिकेच्या मालमत्तांची आणि त्यांच्या सद्यस्थितींची माहिती मागविली होती. मालमत्ता विभागाने दिलेल्या लेखी उत्तरातून प्रशासनानेच तब्बल ४ हजार १८८ मिळकतींच्या प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेच्यया नावाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. नगरसेविका तन्वी दिवेकर यांनी यासंदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव दिला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या मिळकतींची माहिती असलेले संकेतस्थळ तीन वर्षांपासून बंद असल्याकडेही लक्ष वेधले. संकेतस्थळ बंद असल्याने तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्याने महापालिकेला मिळकतींवर लक्ष ठेवणे तसेच या मिळकतींची प्रॉपर्टी कार्डची नोंद करता आली नसावी. यासाठी प्रशासनाने निवृत्त सनदी अधिकारी, महसुल विभागात काम केलेेले निवृत्त उपजिल्हाधिकारी अथवा नायब तहसीलदाराची नेमणूक करून पालिकेच्या मिळकतींची प्रॉपर्टी कार्डवर नोंदणी व त्यांच्या जतनासंबधात योग्य ती पावले उचलावीत, असा प्रस्ताव दिला आहे.
