Pune PMC News | बायोमायनिंगचे काम 550 रुपये प्र. मे. टन दराने होणार ! सर्वात कमी दराच्या रकमेनुसार पाचही पॅकेज मधील बायोमायनिंग चे काम करून घेण्यासाठी आयुक्तांना कस लावावा लागणार
दिल्लीच्या एका कंपनीने दर कमी भरून ‘रिंग’ मोडल्याने ठेकेदार आणि अधिकारी धास्तावले
पुणे : Pune PMC News | देवाची उरुळी येथील कचरा डेपो मधील जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी मागविलेल्या पाच निविदांमधील एका पॅकेजची निविदा ५५० रुपये प्रतिटन याप्रमाणे आली आहे. विशेष असे की आयुक्तांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे उर्वरित चारही पॅकेज मधील सर्वात कमी रकमेच्या निविदाधारकांना याच दराने काम करावे लागणार असून यामुळे महापालिकेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. अल्फा कंपनीचे दर बऱ्याच अंशी कमी दराने आल्याने बायोमायनिंगच्या कामात ‘रिंग ‘ करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
एन जी टीच्या आदेशानुसार देवाची उरली येथील कचरा डेपोमधील जुन्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २०१८ पासून बायोमायनिंग प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत ३१ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली असून अद्याप २८ लाख मेट्रिक टन कचरा तसाच पडून आहे. या कामासाठी पालिकेने पाच निविदा काढल्या होत्या. निविदा काढताना यापूर्वीच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करण्यात आल्याने स्पर्धा निर्माण झाली होती. प्रामुख्याने कचऱ्यातून आरडीएफ ची निर्मिती आणि आर्थिक निकष हे यापूर्वीचे नियम बदलण्यात आले. तसेच महुआ च्या निर्देशानुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना यामध्ये सहभागी करण्यात आले होते.
पाच निविदांसाठी १७ कंपन्यांनी ३८ निविदा भरल्या होत्या. तांत्रिक पडताळणीत यापैकी केवळ आठ कंपन्याच ज्यांना बायोमायनिंगचा अनुभव असलेल्या कंपन्या पात्र ठरल्या. त्यापैकी एका पॅकेज मध्ये सर्वात कमी दराची अर्थात महुआ च्या दरामध्ये ५५० रुपये प्रति मेट्रिक टन ची दिल्लीच्या अल्फा थर्म कंपनीची निविदा कमी दराची ठरली. तर उर्वरित चार पॅकेज मधील दया चरण आणि कंपनीची निविदा कमी दराच्या अर्थात ७१७ रुपयांची निविदा कमी दराच्या ठरल्या आहेत. विशेष असे की एका कंपनीला एकच पॅकेज फारतर दोन पॅकेज चे काम मिळणार आहे.
अल्फा थर्म कंपनीने ५५० रुपये मेट्रिक टन प्रमाणे सर्वात कमी दराची निविदा भरल्याने इतर कंपन्यांना याच दराने काम करावे लागणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. या निविदा आचारसंहिता लागण्यापूर्वीच मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ठेकेदारांची रिंग मोडली?
महुआ च्या दराप्रमाणे अल्फा कंपनीने पाच पैकी एकाच पॅकेज मध्ये सर्वात कमी दराची निविदा भरली आहे. मात्र दया चरण या कंपनीने पाचही पॅकेज मध्ये निविदा भरली आहे. तर अन्य एका कंपनीचे दर हे ७४० च्या आसपास आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी रिंग केली आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोमायनिंग चे काम करणाऱ्या अल्फा या कंपनीने केवळ एकाच पॅकेज मध्ये ५५० दर भरत येथील ठेकेदारांची रिंग मोडल्याची जोरदार चर्चा आहे.
