Pune PMC News | पुणे महापालिकेच्या अभ्यांगत कक्षात अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक होणार

PMC-Health-Department (1)

जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातील प्रेक्षागृहात अभ्यांगत कक्षाचे आयोजन

पुणे : Pune PMC News | प्रशासक कालावधीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेउन त्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू केलेला ‘अभ्यांगत कक्षाचे’ विस्तारीकरण करण्यात आले आहे. यापुढे अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीतीत प्रत्येक सोमवारी आणि गुरूवारी आयुक्त कार्यालयासमोरील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या प्रेक्षा गॅलरीत या कक्षाचे आयोजन करण्यात येणार आहे.

   महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेउन त्या सोडविण्यासाठी चार महिन्यांपुर्वी अभ्यांगत कक्ष हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आयुक्त कार्यालयासमोरील सभागृहामध्ये उपायुक्त तसेच प्रत्येक विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या संबधित विभागाकडून सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. काही तक्रारींचा या अधिकार्‍यांच्या पातळीवर निपटाराही होत होता. परंतू काही क्लिष्ट प्रकरणांमध्ये नागरिक थेट आयुक्तांनाच भेटण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे प्रशासक कालावधीत दैनंदीन कामांचे नियोजन,अधिकार्‍यांच्या बैठका, प्रकल्पांच्या कामांचे नियोजन आणि त्यामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी यामुळे वेळापत्रक कोलमडून पडत आहे.

   या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्तांनी अभ्यांगत कक्ष यापुढे अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या कक्षासाठी महापालिका भवनमधील जुन्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहातील प्रेक्षा गॅलरीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. विस्तारीत इमारतीमध्ये नवीन सभागृह बांधल्यानंतर मागील सहा ते सात वर्षांपासून ही प्रेक्षा गॅलरी जवळपास बंदच आहे. येथे सुमारे १८० आसन व्यवस्था आहे. याठिकाणी काही बदल करून प्रेक्षा गॅलरीचा वापर अभ्यांगत कक्षासाठी करून हे प्रेक्षागृह वापरण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

You may have missed