Pune PMC News | महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प तीन वर्षांपासून ठप्प ! प्रशासन आणि लोकप्रतिनिधीमध्ये प्रकल्प सुरू करण्याबाबत उदासीनता

पुणे : Pune PMC News | माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी नगरी असलेल्या पुण्यातील महापालिकेच्या शाळांमधील ई लर्निंग स्कूल प्रकल्प मागील तीन वर्षांपासून ठप्प झाला आहे. एरव्ही, सुरक्षिततेसाठी महाप्रीत सारख्या कंपन्यांना उघड्यावरून केबल टाकण्याची परवानगी देणारी महापालिका तीन वर्षांपासून ई लर्निंगसारख्या आवश्यक शैक्षणिक सुविधांच्या दहा ते बारा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देउ शकत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
पुणे महापालिकेने मागील सात ते आठ वर्षांपासून त्यांच्या शाळांमध्ये ई लर्निंग उपक्रम सुरू केला. सुरूवातीला खाजगी संस्थेच्या मदतीने काही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आल. नंतर जवळपास सर्वच अर्थात २६५ शाळांमध्ये ई लर्निंगची व्यवस्था उभारण्यात आली. सर्व वर्ग खोल्यांमध्ये स्क्रीन बसविण्यात आला असून शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयातून सॉफ्टवेअरद्वारे दृकश्राव्य स्वरूपात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले. सन २०२० आणि २०२१ मुळे कोरोनाच्या साथीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने हा प्रकल्प बंद राहीला. दरम्यान या कालावधीतच इंटरनेट सेवा खंडीत झाली आणि तेंव्हापासूनच ई लर्निंग बंद झाले आहे.
परंतू प्रशासकराजमध्ये ई लर्निंग सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून फारसे प्रयत्न झाले नाहीत. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या लोक प्रतिनिधींनी देखिल याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ई लर्निंग प्रकल्प जवळपास बासनात गेला आहे. महापालिकेच्या २६५ शाळांमध्ये गरिब कुटुंबातील जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंटरनेटच्या युगात आता एआय तंत्रज्ञान आले आहे. अशावेळीच महापालिकेचा ई लर्निंग प्रकलप बंद झाल्याने प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींचीही अनास्था दिसून येत आहे.
यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप चंद्रन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ई लर्निंग शाळा सुरू करण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. इंटरनेट सुविधा पुरविण्यासंदर्भात बीएसएनएल आणि जिओ या कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे..सुरूवातीच्या टप्प्यात ज्या शाळांमध्ये यंत्रणा तयार आहे, तेथे लवकरात लवकर ई लर्निंग सुरू करण्यात येईल. महापालिका आयुक्तांनी वॉर रुमची स्थापना केली आहे. त्यामध्ये ई लर्निंगचा समावेश करण्यात आला आहे.