Pune PMC News | महापालिका भवनमध्ये पार्किंग अभावी नागरिकांची गैरसोय ! संभाव्य पार्किंग कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाचे प्रयोग
पुणे : Pune PMC News | दीर्घ प्रशासक कालावधीनंतर महापालिका निवडणूक झाल्याने १६५ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा महापालिका भवनमधील राबता वाढणार आहे. याचा थेट परिणाम महापालिका भवनच्या आवारातील वाहन पार्किंगवर होणार आहे. प्रशासनाने प्रायोगीक तत्वावर चार चाकी वाहनांच्या संख्येचा विचार करून नवीन इमारतीतील दुचाकी पार्किंग बंद केल्याने महापालिकेत कामानिमित्त येणार्या सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली आहे. मुख्य इमारतीसमोरील रस्त्याच्याकडेला अनधिकृतपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने या मन:स्तापात अधिकची भर पडली आहे.
महापालिका निवडणूक पार पडली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मागील चार वर्षांपासून बंद असलेल्या पक्ष आणि समित्यांच्या कार्यालयांची डागडुजी करण्यात आली असून प्रशासनासमोर वाहन पार्किंगचे आव्हान देखिल उभे राहीले आहे. साजजिकच समाविष्ट गावांतून महापालिकेत येणारे नगरसेवक आणि कार्यकत्यांना महापालिका भवन येथे वाहने उभी करण्यास येणारी अडचण लक्षात आल्याने प्रशासनाने भवनच्या लगतच्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचार्यांच्या दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे. याठिकाणी साधारण २०० दुचाकी उभ्या करता येउ शकणार आहेत.
प्रशासनाने हा बदल करत असताना नवीन इमारतीतील तळमजल्यापैकी पहिल्या मजल्यावरील दुचाकीचे पार्किंग तसेच जुन्या व नवीन इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत दुचाकी लावण्यास मनाई केली आहे. तसेच जुन्या इमारतीतील दुचाकीचे ओपन पार्किंग केवळ महिला कर्मचार्यांसाठी आरक्षित केले असून लगतच्या दुमजली पार्किंगमधील सर्वात वरचे पार्किंग हे नागरिकांसाठी राखीव ठेवले आहे. परंतू नवीन इमारतीतील तळघर व दोन्ही इमारतींच्या दरम्यानचे दुचाकी पार्किंग बंद केल्याने येथे दररोज उभ्या करण्यात येणार्या ५०० दुचाकींपैकी ३०० दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारती लगतच्या पार्किंगमध्ये जागा मिळत नसल्याने कर्मचारी दुमजली पार्किंगमधील नागरिकांसाठीच्या पार्किंमध्ये दुचाकी लावतात. नागरिकांना दुचाकी लावण्यासाठी जागाच मिळत नसल्याने ते इमारतीच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा दुचाकी पार्क करत आहेत. या दुचाकींवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
यासंदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले महापालिका भवनच्या आवारातील वाहन पार्किंगबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. सभागृह सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात येणार्या अडचणी समोर येतील. महापालिका कार्यालयात ड्युटी करणार्या कर्मचार्यांसाठी बससेवा सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. तसेच मेट्रो मार्गावरील कर्मचार्यांना मेट्रोने महापालिका भवन येथे ड्युटीसाठी येण्यासाठी आवाहन करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. महापालिकेत कामानिमित्त येणार्या नागरिकांच्या पार्किंग सुविधेस प्राधान्य देणण्याकरिता प्रशासन सर्व शक्यता तपासून नियोजन करेल, असेही पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
