Pune PMC News | समान पाणी पुरवठा योजनेतील टाक्यांचा टप्प्याटप्प्याने वापर सुरू ! उपनगरातील टँकरच्या फेर्या कमी झाल्या
पुणे : Pune PMC News | समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांपैकी ३० हून अधिक टाक्यांचा वापर सुरू करण्यात आल्याने प्रामुख्याने उपनगरातील पाण्याच्या टँकरच्या फेर्या कमी झाल्या आहेत. लवकरच उर्वरीत टाक्यांदेखिल सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू असून येत्या काही महिन्यांत पाण्याची समस्या बर्याच अंशी कमी होईल, असा विश्वास पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी व्यक्त केल आहे.
नंदकिशोर जगताप यांनी सांगितले, की बाणेर, बालेवाडी येथील तीन टाक्यांचा वापर मागील काही महिन्यांपुर्वी सुरू करण्यात आला आहे. यामुळे या परिसरात पुर्वीपेक्षा पाणी पुरवठ्यात चांगली सुधारणा झाली आहे. या भागातील टँकरने पाण्याची मागणी बर्याच अंशी कमी झाली आहे. पाषाण लिंक रस्त्याजवळील ब्रिटीश कालिन पंपींग बंद करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज तीन ते चार एमएलडी पाणी लिकेजच्या माध्यमातून वाया जायचे. तसेच पंपिंगसाठी दरमहा २० लाख रुपये वीजबील यायचे. येथील नवीन पाण्याच्या टाकीमुळे ग्राव्हीटीने पाणी पुरवठा सुरू झाल्याने पंपिंग स्टेशनवरील वीजेचा खर्च कमी झाला आहे. बाणेर येथील पंपिंग स्टेशनला चतुश्रृंगी जलकेंद्रातून पाणी वाहून नेणारी जुनी लाईनमधूनही लिकेज व्हायचे. पंचवटी येथील नवीन टाकी आणि नवीन पाईपलाईनमुळे ही गळती देखिल बंद झाली आहे. बोपोडी येथील भोईटे वस्तीत पाण्याची टाकी बांधल्याने तसेच नवीन पाईपलाईनचे काम केल्याने येथे वर्षानुवर्षे २० टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे.
हांडेवाडी येथील भुजबळ टाउनशिप येथील नव्या पाण्याच्या टाकीचा वापर सुरु झाला आहे. येथे लष्कर जलकेंद्रातून रामटेकडी येथील टाकीद्वारे पाणी पुरवठा व्हायचा. तो देखिल अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना टँकर अवलंबून राहायला लागायचे ते भुजबळ टाउनशिप येथील नवीन टाकीमुळे कमी झाले आहे. धायरी येथील हायब्लिज सोसायटीजवळच्या पाण्याच्या टाकीमुळे येथील नागरिकांना विहीतून पुर्वी होणारा रॉ वॉटरचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. तसेच पुर्वीपेक्षा अधिक पाणी मिळत असल्याने या परिसरातील पाणी टंचाई जवळपास संपुष्टात आली आहे.
कात्रज कोंढवा रस्त्यावरील प्रलंबीत मुख्य पाईपलाईनचे काम सुरू आहे. येथील सुंदरबन परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांच्या खालून पुशींग करून पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम लवकरच पूर्ण होत असून या लाईनवर अप्पर इंदिरानगर, कोंढवा, एनआयबीएम परिसरातील १४ टाक्यांना पाणी पुरवठा होणार आहे. फर्ग्युसन महाविदयलयामागील टेकडीवरील पाण्याच्या टाकी देखिल लवकरच वापरात येईल. यामुळे आपटे रस्ता, मॉडेल कॉलनी, पशिवाजीनगर परिसरात चांगल्या दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. माणिकबाग, डिएसके विश्व, हडपसर बस डेपो येथील दोन, तुकाई टेकडी तसेच क्रिसेंट येथील टाकीचा वापरही सुरू करण्यात येत आहे. यामुळे लवकरच उपनगरातील टँकरची संख्या कमी होईल, असा विश्वास नंदकिशोर जगताप यांनी व्यक्त केला आहे.
लिकेज शोधण्यासाठी रोबोट खरेदी
पाईपलाईनमधील लिकेज शोधण्यासाठी महापालिका रोबोट खरेदी करणार आहे. रोबोट खरेदी, त्याचा वापर आणि मेन्टेनन्ससह सुुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेने समान पाणी पुरवठा योजना सुरु केल्यानंतर जमीनी खालून जाणार्या पाईपलाईनमधील लिकेज शोधण्यासाठी यापुर्वी भाडेतत्वावर प्रायोगीक तत्वावर रोबोटचा वापर केला आहे. या रोबोटच्या माध्यमातून पाच ते सहा ठिकाणचे लिकेजचा शोध घेउन त्याची दुरूस्ती करणे व पाण्याची बचत करणे शक्य झाले आहे. रोबोटची परिणामकारीता लक्षात घेउन महापालिकेनेच रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नंदकिशोर जगताप यांनी दिली.
