Pune PMC News | पर्वती मतदारसंघातील विकास कामांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मागे घेतला; राज्यमंत्री तथा आमदार माधुरी मिसाळ संतप्त, प्रशासनाने बदनामी केल्याचा आरोप, खुलासा करण्याची केली मागणी

Pune PMC News | Proposal for development works in Parvati constituency withdrawn in general meeting; Minister of State and MLA Madhuri Misal angry, accused of defamation by the administration, demanded clarification

पुणे : Pune PMC News । पर्वती मतदार संघातील विविध ठिकाणच्या विविध विकासकामांसाठी स्थायी समितीमध्ये कलम ७२ ब नुसार मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत मागे घेतल्याने राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ महापालिका प्रशासनावर संतप्त झाल्या आहेत. यामुळे आपली मानहानी झाली असून कुठल्या कारणास्तव हा प्रस्ताव मागे घेतला याचा खुलासा करावा असे खरमरीत पत्र त्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांना धाडले आहे.

राज्यमंत्री मिसाळ यांनी हे पत्र प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये पर्वती मतदारसंघातील नागरिकांच्या विविध गरजा पाहता शहराच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विकास कामांना महापालिकेकडून निधी उपलब्ध करुन देण्याकामी वरील संदर्भीय पत्रान्वये मी कळविले होते. पर्वती मतदारसंघातील मी आमदार म्हणुन लोकप्रतिनिधी आहे. मतदार संघातील विकासाचा विचार करणे व त्याप्रमाणे आपणास पत्र देणे हे माझे कर्तव्य आहे.

त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ७२ (ब) अन्वये एकूण नमूद २१ विकास कामे पूर्ण होई पर्यंत निधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासक यांनी स्थायी समितीमध्ये सदर कामांना वित्तीय व प्रशासकीय मंजूरी दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम ७२ (ब) नुसार पुढील बजेटसाठी तरतुद करुन ठेवण्याचे कायदेशिर बंधन प्रशासनावर व मुख्य सभेवर आहे. एखाद्या वर्षात तरतुद कमी पडत असेल तर तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भविष्यात त्यांची तरतुद करण्यासाठी या कलमाचा वापर करण्यात येतो.

दरम्यान मोठ्या प्रकल्पांसाठी ७२ ब नुसार प्रस्ताव मंजुर करण्याची परंपरा असताना प्रशासनाने एकाच आमदाराच्या छोट्या कामांसाठी ७२ ब नुसार पुढील अंदाजपत्रकातही तरतुद केल्याबाबत माध्यमांनी विचारणा केल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव मागे घेणार असल्याचे सांगितले होते. यासंदर्भातील बातम्यांचा संदर्भ देत मिसाळ यांनी प्रशासनाने त्यांची मानहानी केल्याचा निवेदनात आरोप केला आहे. स्थायी समितीने मंजुर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला असताना आयुक्तांनी नगरसचिव विभागाला सभेच्या अगोदरच्या दिवशी हा प्रस्ताव तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी माघारी घेत असल्याचे पत्र दिले.

याबाबत माझ्याशी साधी चर्चा देखिल करण्यात आली नाही. तसेच या कार्यपत्रीकेवर अन्य एका आमदाराच्या मतदारसंघातील कामाचाही ७२ बचा प्रस्ताव होता, तो मात्र कायम ठेवण्यात आला. माझ्या कामांचा प्रस्ताव मागे घेतल्याने आणि वर्तमान पत्रात याच्या बातम्या आल्याने मी फार व्यथित झाले आहे. प्रशासनाने कुठल्या अधिकारात आणि कोणत्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी माझा प्रस्ताव मागे घेतला याचा खुलासा करावा, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे. मिसाळ याची प्रत त्यांच्याच पक्षाचे सभागृह नेते गणेश बिडकर यांना देखिल पाठविली आहे.

दरम्यान १८ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासन हा प्रस्ताव मागे घेण्यात येत असल्याचे नगरसचिवांनी पुकारल्यानंतर ११९ सदस्य असलेल्या भाजपमधील एकानेही प्रश्‍न उपस्थित केला नाही. उलट काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी या सभेत सभागृह नेते गणेश बीडकर यांना तुमच्या मंत्र्यांचा प्रस्ताव मागे घेतला जातोय आणि तुम्ही काहीच बोलत नाहीत, असे डिवचले होते.

You may have missed