Pune PMC News | पुण्यात अतिक्रमण कारवाईवर प्रश्नचिन्ह; क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांची मनपाकडे कठोर भूमिकेची मागणी

Pune PMC News | Question mark on encroachment action in Pune; Creative Foundation President Sandeep Khardekar demands strict stance from Municipal Corporation

पुणे : Pune PMC News |  शहरातील अतिक्रमण कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून अतिक्रमण कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

खर्डेकर यांनी सांगितले की, त्यांच्या तक्रारीनंतर नदीपात्र तसेच कर्वेनगर आणि ताथवडे उद्यान परिसरात फ्रंट मार्जिन व साईड मार्जिनमधील शेडवर कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरती असल्याचे दिसून येत असून, संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण जैसे थे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मनपाने केलेल्या कारवाईची प्रसिद्धी वृत्तपत्रांमधून करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष पाहणी करताना परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याचे त्यांनी नमूद केले. जप्त केलेले साहित्य संबंधितांना पुन्हा कसे मिळते, तसेच याबाबत मनपाचे नेमके धोरण काय आहे, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच साईड आणि फ्रंट मार्जिनमधील शेडवर कारवाई झाल्यानंतरही काही दिवसांत त्या पुन्हा उभारल्या जातात आणि त्याठिकाणी व्यवसाय सुरूच राहतो. अशा प्रकारचा व्यवसाय कायदेशीर आहे का, याबाबतही स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील अतिक्रमणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे सांगत, या प्रकरणात प्रभावी आणि ठोस कारवाई करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे.

You may have missed