Pune PMC News | राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघासाठीचा ‘तो ’ प्रस्ताव अखेर प्रशासनाने मागे घेतला

Pune PMC News

पुणे : Pune PMC News |  पर्वती मतदार संघाच्या आमदार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मतदार संघात विविध ठिकाणी सुचविलेल्या कामांसाठी  तब्बल  ३२ कोटी ८३ लाख रुपयांची तरतूद महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायद्यातील कलम ७२ ब नुसार पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात करण्याचा पथ विभागाने मांडलेला अजब प्रस्ताव आयुक्तांनी चर्चेविनाच स्थायी समितीमध्ये मंजुर केला.  हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढेही ठेवण्यात आला.  नगरसेवकांनी करायची कामे आमदारांनी सुचवून या कामांसाठी ७२ ब नुसार प्रशासनाने एवढी मोठया रकमेची तरतूद केल्याने चर्चेचा विषय ठरली. यावरून माध्यमांतून आज प्रशासनावर टीकेची झोड उठविल्यानंतर प्रशासनाने सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मागे घेतला.

पर्वतीच्या आमदार तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मागील वर्षी जुलैमध्ये पथ विभागाला पत्र देउन मतदार संघातील छोटीमोठी २१ कामे सुचविली होती. या कामांसाठी प्रशासनाने एस्टीमेटच्या जेमतेम २० टक्केच निधीची तरतूद केली. या सर्व कामांना एक वर्षांहून अधिक कालावधी लागणार असल्याने प्रशासनाने उर्वरीत ८० टक्के रक्कम अर्थात ३२ कोटी ८३ लाख रुपये पुढील वर्षीच्या अर्थात २०२६- २७ या वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावे असा प्रस्ताव डिसेंबरमध्ये पथ विभागाने महापालिका आयुक्तांना पाठविला. 

या कालावधीत निवडणुक आचारसंहिता असल्याने यासंदर्भातील प्रस्ताव आठवडाभरापुर्वी अर्थात ६ फेब्रुवारीला आयुक्तांच्या स्वाक्षरीने स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी आला. आयुक्तांनी याला मान्यता देखिल दिली.  पथ विभाग अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे आहे. तर हा प्रस्ताव तयार करण्यात आला त्यावेळी सध्याचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हे  पथ विभागाचे प्रमुख होते.  त्यांच्या माध्यमातूनच हा प्रस्ताव ओमप्रकाश दिवटे यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांकडे गेला होता.

हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर होता..चुकीच्या पद्धतीने किरकोळ कामांसाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यावरून माध्यमांनी प्रशासनावर टीकेची झोड उठविल्यानंतर प्रशासनाला उपरती झाली.  आज झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. विशेष असे की महापालिकेत भाजपची सत्ता  असून मिसाळ या भाजपच्या आमदार आहेत.

You may have missed