Pune PMPML Bus | पुणे पीएमपी बसेसमध्ये असणार ‘एआय’चे कॅमेरे; मंजुरी मिळताच कामाला सुरुवात

पुणे :– Pune PMPML Bus | पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पीएमपी म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड महत्वाची संस्था (PMP Administration) आहे. पीएमपी बसने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. लवकरच पीएमपी बसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तावर (एआय) आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास पीएमपी एआयचा वापर करणारी देशातील पहिली प्रवासी वाहतूक संस्था असेल.
पीएमपी बसमध्ये एआय असणारे कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्यातील एक कॅमेरा बसच्या स्टिअरिंगजवळ लावण्यात येणार आहे. त्या माध्यमातून चालकावरही लक्ष ठेवता येईल. पीएमपी बसचे काही अपघात चालकांच्या चुकांमुळे झाले आहेत. तसेच, काही चालक वाहतूक नियमांचे पालन देखील करताना दिसत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींवर एआय कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील अनेक मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे बसमध्ये बसवण्यात येणारे एआय कॅमेरे प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देतील.
पाच कोटींचा खर्च
दरम्यान, पीएमपी प्रशासनाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव सादर करण्यासाठी एप्रिलच्या अखेरीस पीएमपी अधिकाऱ्यांना नवी दिल्लीला बोलावण्यात आले. एआय कॅमेरे बसवण्याबाबत तेथे सादरीकरण केले जाईल. मंजुरी मिळताच सर्व बसेसमध्ये एआय कॅमेरे बसवले जातील. या योजनेची किमत सुमारे पाच कोटी आहे.