Pune Police News | भूमी अभिलेखाच्या निलंबिंत उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्याविषयी तक्रार द्या; आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

पुणे : Pune Police News | भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकर मापक किरण येटाळे यांच्यावर २५ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविषयी कोणाच्या फौजदारी स्वरुपाच्या तक्रारी असतील तर, त्या द्याव्यात, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
हडपसर येथील एका जमिनीच्या मोजणी प्रकरणात उपअधीक्षक अमरसिंह पाटील व भूकर मापक किरण येटाळे याने जमिनीची मोजणी केल्यानंतर जमीन मालकाकडे क प्रत देण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी ती न दिल्याने पाटील व येटाळे याने त्यांच्या जमिनीचे चुकीचे क प्रत तयार करुन जमीन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान केले होते. याबाबत जमीन मालक कुणाल अष्टेकर यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानंतर तातडीने हालचाली होऊन अमरसिंह पाटील व किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच त्यांना निलंबित करण्यात आले.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. या आरोपींविरुद्ध तसेच भूमि अभिलेख कार्यालय, हवेली यांच्या संबंधी नागरिकांच्या काही फौजदारी स्वरुपाच्या तक्रारी असतील तर त्या नागरिकांनी पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.