Pune Police News | पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील 2 पोलीस अधिकारी बडतर्फ होणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली माहिती

Pune CP Amitesh Kumar

पुणे : Pune Police News | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे. कारण या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठविला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ” पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोन पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कर्तव्यास असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. त्यानूसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे.”

नेमकं प्रकरण काय?

कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परत जात असताना अल्पवयीन कारचालकाने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या या मुलाला वाचवण्यासाठी नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय हस्तक्षेप आणि पैशाचा वापर करून त्यातील आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे २ डॉक्टर यांच्यासह १० जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजण अद्यापही कारागृहात आहेत.

You may have missed