Pune Police News | पुणे: गुन्हे घडणाऱ्या अडीच हजार हॉटस्पॉटचे पुणे पोलिसांकडून मॅपिंग, 30 हजार गुन्हेगारांची माहिती संकलित; गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कॉप्स

Pune CP Amitesh Kumar

पुणे : Pune Police News | शहरात सतत गुन्हे घडणाऱ्या २ हजार ५७६ हॉटस्पॉटचे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मॅपिंग करण्यात आले आहे. परिमंडल-५ आणि ३ मधील पोलिस ठाणांच्या हद्दीत असे सर्वाधिक हॉटस्पॉट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठिकाणी कॉप्स २४ च्या माध्यमातून दिवस आणि रात्री, अशा दोन सत्रात ५ वेळा गस्त घातली जात असून, त्याची माय सेफ आणि डायल ११२ च्या एमडीटीमध्ये नोंदणी केली जाते आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेकडून तब्बल ३० हजार गुन्हेगारांचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे. हा सर्व डेटा पुणे पोलिसांनी मायसेफ क्राईम मोड्यूलवर जमा केला आहे. त्यामध्ये गुन्हेगाराचे पूर्व रेकॉर्ड, तो राहत असलेले वास्तव्याचे ठिकाण नोंदविण्यात आले आहे.

स्थानिक पोलिस ठाणे आणि कॉप्स २४ च्या बीट मार्शलनी हे गुन्हेगार त्यांच्या वर्गवारीनुसार कितीवेळा तपासले, याची सर्व माहिती अद्ययावत केली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही उपक्रमांवर गुन्हे शाखेकडून लक्ष ठेवले जात असून, त्यांच्या दिवसभरातील कामाचा लेखाजोखा घेतला जात आहे. २०२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत खुनाच्या घटनांचे प्रमाण साडेसहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) म्हणाले, ” पोलिसांचा रस्त्यावरील वावर वाढल्यामुळे गुन्हेगारांवर अंकुश निर्माण होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाईवर भर, स्थानिक पोलिस आणि कॉप्स २४ च्या माध्यमातून गस्त वाढविण्यात आली. सतत गुन्हे घडणाऱ्या अडीच हजार ठिकाणांचे मॅपिंग करण्यात आले. त्याचबरोबर ३० हजार गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसिंग राबविण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.”

You may have missed