Pune Rain Update | पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत मुसळधार पाऊस, आज पुन्हा ऑरेंज अलर्ट, आजचा हवामान अंदाज काय?

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन – Pune Rain Update | आषाढ महिना संपत आहे आणि लवकरच श्रावण सुरू होत आहे. त्यामुळे आता राज्याला श्रावणातील पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी झाली आहे, परंतु घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरूच आहे. मंगळवारी (२२ जुलै) पश्चिम महाराष्ट्रासाठी जिल्हावार हवामान अंदाज जाणून घेऊया.
पुढील २४ तासांत पुणे आणि पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, पुढील २४ तासांत पुण्यात कमाल तापमान ३० आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.
सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत हलका पाऊस पडला. सातारा परिसरात ०.४ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत साताऱ्यातील कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. घाटांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील २४ तासांत कमाल तापमान २८ अंशांपर्यंत पोहोचेल. तसेच, कोल्हापूर घाटांवर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पाऊस पडत आहे. कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील २४ तासांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात हलक्या पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यातील कमाल तापमान ३२ आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील.
दरम्यान, पुढील काही दिवस हवामान परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस राहील. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.