Pune Rural Police MCOCA Action | शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचा निर्घुण खुन करणार्‍या योगेश भामेसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

MCOCA

पुणे : Pune Rural Police MCOCA Action | शासकीय ठेकेदार विठ्ठल सखाराम पोळेकर यांचा खंडणीसाठी निर्घुण खुन करणाया टोळीप्रमुख योगेश भामे व त्याच्या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केली आहे.

योगेश ऊर्फ बाबु किसन भामे (वय ३२), रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२ दोघे रा. डोणजे, ता. हवेली), मिलिंद देविसदास थोरात (वय २४, रा. वाघोली, ता. हवेली, मुळ रा. बेलगाव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), शुभम पोपट सोनवणे (वय २४, रा. वाघोली, मुळ रा. खळवाडी, चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), रामदास दामोदर पोळेकर (वय ३२, रा. पोळेकरवाडी, डोणजे, ता. हवेली) अशी मोका कारवाई झालेल्या टोळीचे नाव आहे. या टोळीचे खडकवासला, डोणजे तसेच सिंहगड रोड परिसरात वर्चस्व आहे. टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी त्यांनी ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्याकडे असलेल्या रस्त्याच्या कामात अडथळा आणू नये, यासाठी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याला त्यांनी नकार दिल्यानंतर योगेश भामे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने पोळेकर हे सकाळी फिरायला बाहेर पडले असताना त्यांचे अपहरण करुन त्यांचा खुन केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात फेकून दिले होते.

हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या आरोपींना पकडले. या टोळीने सातत्याने व संघटीतपणे सुरु ठेवलेल्या बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यांना वेळीच पायबंद घालणे अत्यंत निकडीचे झाल्याने हवेली पोलिसांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार (मोका) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पकंज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी हे करीत आहेत.

You may have missed