Pune Rural Police News | साठेआठ लाखांच्या 83 शेळ्या चोरणार्‍या सराईत गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळून 11 गुन्हे उघडकीस; अकलुज, यवतच्या बाजारात नेऊन विकत होते चोरलेल्या शेळ्या

Pune Rural Police

पुणे : Pune Rural Police News | इंदापूर, वालचंदनगर, यवत येथील शेळ्या, बोकड चोरुन नेणार्‍या सराईत गुन्हेगार टोळीला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. या टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. ही टोळी चोरलेल्या शेळ्या वेगवेगळ्या बाजारात नेऊन विकत होते. त्यांनी काही शेळ्या अकलुज यवतच्या बाजारात नेऊन विकल्या¯f अन्य तीन आरोपी मिळाल्यावर त्यांनी आणखी कोठे कोठे शेळ्या नेऊन विकल्या, याची माहिती मिळू शकेल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सांगितले.

रोहित दत्तात्रय कटाळे (वय २०, रा. तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली), साहिल विलास चौधरी (वय २०, रा. बोधेवस्ती, उरुळी कांचन), वैभव ऊर्फ गोट्या तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन), सचिन अरुण कांबळे (रा. तळवाडी चौक, उरुळी कांचन), खंडु महाजन (रा. वडापुरी, ता. इंदापूर) अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून वालचंदनगर येथील ७, इंदापूर आणि यवत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी २ असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

इंदापूर व वालचंदनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेळी चोरीचे गुन्हे वाढू लागले होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तसेच सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, हवालदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, निलेश शिंदे हे इंदापूर पसिरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शेळी व बोकड चोरी करणारी टोळीने आंबळे रेल्वे स्टेशन येथून कॉपर वायर चोरुन आणलेल्या आहेत. ते इंदापूरमधील वरकुटे गावाजवळील तलावाच्या जवळ बसले आहेत. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले. तेव्हा तलावाच्या ठिकाणी पाच जण बसून काहीतरी जाळत बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. त्यांच्यातील रोहित कटाळे हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी सचिन कांबळे याच्या मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पोचा वापर करुन वालचंदनगर, इंदापूर व यवत परिसरातील शेळी चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी हा टेम्पो जप्त केला आहे.

रोहित कटाळे याच्या मदतीने साहिल चौधरी याला उरुळी कांचन येथून ताब्यात घेतले. दोघांना वालचंदनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक केली आहे. या टोळीतील गुन्हेगार वैभव तरंगे याच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत. लोणी काळभोर पोलीसांमार्फत त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. रोहित कटाळे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार स्वप्निल अहिवळे, अभिजित एकशिंगे, निलेश शिंदे, राजू मोमीन, अतुल ढेरे, योगेश नागरगोजे, अमोल शेडगे यांनी केली आहे.

You may have missed