Pune Traffic Jam Issue | पुणे शहरातील वाहतूक कोंडी 53 टक्क्यांनी कमी झाल्याचा पोलिसांचा दावा; वाहतुकीचा वेग जवळपास 10.44 टक्के इतका वाढला

पुणे : Pune Traffic Jam Issue | मागील दोनच महिन्यापूर्वी जगातील वाहतूक कोंडीबाबत समोर आलेल्या एका अहवालात पुणे हे वाहतूक कोंडीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले होते. दरम्यान आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. पुणे शहरातली वाहतूक कोंडी निम्म्याने कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर वाहतुकीचा वेगही वाढला असल्याचे त्यांनी सांगितले वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर वाहतुकीत सुधारणा केल्याचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीबाबत पोलिसांनी म्हंटले आहे की , पुणे शहरातली वाहतूक कोंडी ५३ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर वाहतुकीचा वेग हा जवळपास १०.४४ टक्के इतका वाढला आहे. शहरात सर्वात पहिल्यांदा एटीएमएस (अडपटीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम), गुगल मॅप्स, नागरिकांच्या तक्रारी व सोशल मिडिया यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करून वाहतुकीत सुधारणा करण्यात आली आहे.
वाहतूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. याशिवाय सिग्नल यंत्रणेमध्ये बदल करण्यात आले. तर ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था केली गेली. या सगळ्या बदलांमुळे आणि अंमलबजावणीमुळे पुणेकरांचा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी होणार आहे. याशिवाय नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेअंतर्गत मागील वर्षाच्या ३ महिन्याच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून कारवाईत सुद्धा दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.