Pune Traffic Police Action | ट्रिपल सीट जाणार्‍या 1454 वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई; एका दिवसात 6 हजार वाहनांवर कारवाई करुन 16 लाखांचा दंड वसुल

Traffic Police

पुणे : Pune Traffic Police Action |  वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करुन ट्रिपल सीट जाणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक शाखेसह ४४ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विशेष मोहिम राबवत १४५४ वाहनचालकांवर कारवाई केली. त्याचबरोबर सर्व प्रकाराचे वाहतूक नियमभंग करणार्‍या ५ हजार ९२१ वाहनांवर कारवाई करुन १६ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. या ट्रिपल सीट व मोटार वाहन उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात  मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला. त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांनी त्यांना समुपदेशन केले.

वाहतूक नियमभंग करणार्‍यांमुळे त्यांच्या जीवाला धोका असतोच, त्याचबरोबर इतरांच्याही जीवाला ते धोका निर्माण करीत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांमुळे शहरातील अपघातात वाढ होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील रस्त्यांवर ट्रिपल सीट वाहनांवर मंगळवारी वाहतूक शाखेचे ३० विभाग तसेच सर्व ४४ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात ट्रिपल सीट जाणार्‍या १४५४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार १४४ चलन पेड करुन घेण्यात आली. त्यामधून १६ लाख १८ हजार ४०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय ५ हजार ९२१ चलन कारवाई करण्यात आली.

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित व शिस्तबद्ध वाहन चालवावे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.

You may have missed