Pune Traffic Police News | राँग साईडने जाणार्या 1230 जणांवर एकाच दिवसात वाहतूक पोलिसांची कारवाई, 5 लाख दंड वसुल
पुणे : Pune Traffic Police News | थोडेसेच तर आहे, काय होणार उलट गेले तर असे समजून लांबचा वळसा टाळण्यासाठी थोडे अंतर उलट्या दिशेने जाणार्या वाहनचालकांना गुरुवारी वाहतूक पोलिसांनी जागोजागी पकडून त्यांच्यावर राँग साईडने वाहन चालविल्याबद्दल कारवाई केली.
शहरात दररोज १ हजारांहून अधिक वाहनांची भर पडत आहे. त्यामुळे आता सर्वच छोट्या, मोठ्या रस्त्यांवर वाहनांचा पूर आल्यासारखे गर्दीच्या वेळी दृश्य असते. अशातच राँग साईडने येणार्या वाहनांमुळे वाहतूकीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोच, अपघाताची शक्यताही वाढते. त्यामुळे राँग साईडने वाहन चालविणारे व ट्रिपल सीट वाहनचालकांवर गुरुवारी १८ डिसेंबरला वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली.
त्यात ट्रिपल सीट असणार्या ३२८ मोटारसायकलचालकांवर कारवाई करण्यात आली. त्याचवेळी राँग साईडने वाहन चालविणारे १२३० वाहनचालक पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून ५ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अचानक नाकाबंदी करुन १४ मद्यपी वाहनचालकांवर ड्रँक अन्ड ड्राईव्हची केस करण्यात आली आहे. या अगोदरही वाहतूक पोलिसांनी ५ ते ७ डिसेंबर दरम्यान २० ठिकाणी नाकाबंदी करुन मद्यपी १७६ वाहनचालकांवर कारवाई केले होती.
वाहतूक नियमांचे पालक न केल्यास अपघाताचा धोका वाढतो. नियमांचे काटेकोर पालन केल्यास शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित राहते. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी विशेषत: रिक्षाचालक व दुचाकी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
