Pune Traffic Police | पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॉफिक अ‍ॅप’चा ‘स्कॉच’ पुरस्काराने गौरव; यापूर्वी पुणे पोलिसांच्या ‘सेवा’ अ‍ॅपला मिळाला होता ‘स्कॉच’अवॉर्ड

Pune Traffic Police | Pune Traffic Police's 'PTP Traffic App' honoured with 'Scotch' award; Earlier, Pune Police's 'Seva' app had received the 'SKoch' award

पुणे : Pune Traffic Police | कोरोना काळात स्थलांतरीतांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या कोविड १९ व्यवस्थापन तसेच नागरिक केंद्रीत डिजिटल सेवांसाठी सुरु केलेले ‘सेवा’ अ‍ॅपला २०२० मध्ये ‘स्कॉच’अवॉर्डने पुणे पोलिसांचा गौरव करण्यात आला होता. त्यानंतर आता वाहतूक नियमांची अंमलबजावणीमध्ये नागरिकांच्या सहभागासाठी सुरु केलेल्या ‘पीटीपी ट्रॉफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्डने गौरविण्यात आले आहे.

भारतातील सुशासन, डिजिटल इनोव्हेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना ‘स्कॉच’पुरस्कार दिला जातो. नाविण्यपूर्ण डिजिटल सेवा पुरविणार्‍या उपक्रमांसाठी हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार ‘स्कॉच’  ग्रुप या स्वतंत्र थिंक टँक संस्थेमार्फत दिला जातो. शासन, पोलीस विभाग, सार्वजनिक संस्था, बँक, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे मुल्यांकन करुन त्यांना ‘स्कॉच’ अवॉर्ड प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी प्रकल्पांना काही पात्रता फेर्‍या पार कराव्या लागतात. प्रथम प्रकल्पाची नोंदणी व प्राथमिक छाननी केली जाते. त्यानंतर निवडलेल्या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन व तज्ञ समितीसमोर मुल्यांकन होते. पुढील टप्प्यात प्रकल्पाचे स्वतंत्र ज्युरी मुल्यांकन केले जाते. या प्रक्रियेत प्रकल्पाचा नाविन्यपूर्णपणा, समाजावर होणारा सकारात्मक परिणाम, कार्यक्षम अंमलबजावणी, पारदर्शकता, टिकाऊपणा व सार्वजनिक हिताला होणारा फायदा या निकषांवर तपास केला जातो. सर्व टप्प्यांमध्ये उच्च गुण मिळवणार्‍या प्रकल्पांना अंतिमत: स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट किंवा स्कॉच अ‍ॅवॉर्ड प्रदान करण्यात येतो.

पुणे वाहतूक पोलिसांच्या पीटीपी ट्रॉफिक अ‍ॅपचे १४ जून २०२५ मध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, ओमिनी ब्रीज टेक्नॉलॉजीचे संचाकल राजेंद्र काणे यांच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे. या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅप चालू झाल्यापासून ८ महिन्यांच्या कालावधीत १ लाख ४० हजारांहून अधिक नागरिक याचा वापर करीत आहेत. या नागरिकांकडून २ लाखांपेक्षा जास्त नियमभंगाची माहिती पोलिसांना सादर करण्यात आली आहे. त्यावर १२ कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा दंड नियमभंग करणार्‍यांना आकारण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहतूक कोंडीस कारणीभूत असणार्‍या १) अपघात, २) वाहनात बिघाड, ३) रस्त्यावरील खड्डे, ४) वाहतूक कोंडी, ५) रस्त्यात तेल गळती, ६) रस्त्यावर पाणी साचणे, ७) रस्त्यावर झाड पडणे, ८) रस्त्यात बेवारस असणारे वाहन इत्यादी अडथळ्यांची माहिती नागरिकांकडून अ‍ॅपद्वारे वाहतूक पोलिसांना कळविण्यात येते. आतापर्यंत ५ हजार ४०० पेक्षा जास्त घटनांचा रिपोर्ट नागरिकांकडून कळविण्यात आला असून त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक घटनांवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे.

शहर वाहतूक पोलिसांनी विकसित केलेल्या पीटीपी ट्रॉफिक अ‍ॅपची स्कॉच पुरस्कार या अभिनव उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराची अधिकृत घोषणा ११ मार्च २०२६ रोजी करण्यात आली. हा पुरस्कार २८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण व अंमल बजावणी प्रक्रियेत पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, पोलीस हवालदार शरद दौंड, टेक्निकल अ‍ॅडव्हायझर ओमिनी ब्रीज टेक्नॉलॉजीचे संचालक राजेंद काणे, इंजिनिअर नितीन वैद्य व क्रिश इंट्राट्रेड कंपनीचे सपोर्ट मॅनेजर अमित गोंजारी यांनी सहकार्य केले आहे.
२०२० मध्ये पुणे पोलिसांच्या नागरिकांच्या सुविधांसाठी सुरु केलेल्या ‘सेवा’अ‍ॅपला स्कॉच पुरस्कार मिळाला होता. या अ‍ॅपचा अजूनही नियमितपणे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये उपयोग केला जात आहे.

You may have missed