Raghvendra Bappu Mankar | अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण 2027 आधी पूर्ण व्हावे: नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची मागणी
पुणे : Raghvendra Bappu Mankar | शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडले असल्याची बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहण्याची चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.
अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी हे ४३ ते ५३ वयोगटातील आहेत. भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयामार्फत विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून, २०२७ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाची अट ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आलेली असून ते प्रशिक्षण व पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळही अग्निशमन दलास उपलब्ध होऊ शकणार आहे.
‘अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविण्याचे काम करतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नमूद केले. तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारली जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. उपलब्ध अनुभवी मनुष्यबळाला भविष्यात पदोन्नतीच्या संधींत सामावून घेता यावे, यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे, तसेच २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्याकडे केली.
यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिले असल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर
यांनी सांगितले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
