Ramdas Athawale At Bhau Rangari Ganpati |’विधानसभेला महायुतीचं सरकार येवो हे बाप्पाकडं मागणं’, रामदास आठवलेंनी घेतलं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

पुणे: Ramdas Athawale At Bhau Rangari Ganpati | देशभरात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सर्वत्र उत्साह आणि नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे-मुंबई या शहरांमध्ये देशभरातल्या कानाकोपऱ्यातून लोकं या उत्सवात सहभागी होत असतात.
आज (दि.१०) रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत रामदास आठवले यांनी पुनीतदादा बालन (Punit Balan) हे अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा करत असतात, असे म्हणत कौतुक केले आहे. अशा उत्सवामध्ये आपण सर्वानी एकत्र आलं पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्याकडून आठवले यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
बाप्पाकडे काय मागितले या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, केंद्रात आमचं सरकार आहे त्याप्रमाणे आगामी विधानसभेला पुन्हा सत्ता आली पाहिजे. राज्यात महायुती सरकार आहे. लोकसभेला आमच्या जागा कमी आलेल्या असल्या तरीसुद्धा विधानसभेला हा संविधानाचा, आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. त्यामुळे नक्कीच आमचं सरकार येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याबद्दल बाप्पाकडे आपण मागणी केलेली असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले.
यावेळी मंत्री आठवले यांच्या सोबत ऍड. मंदार जोशी (Adv Mandar Joshi) आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.