Ratan Tata News | दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या संपत्तीचा मोठा भाग धर्मादाय संस्थांना दान

मुंबई : Ratan Tata News | दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग धर्मादाय संस्थांना दान करण्यात येणार आहे.माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रतन टाटा यांची सुमारे ३८०० कोटी रुपयांपैकी बहुतांश संपत्ती ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ (आरटीईएफ) आणि ‘रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट’ (आरटीईटी) यांना दिली जाईल. उर्वरित मालमत्ता त्याचे कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या सहकाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे.
अधिकच्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी २३ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या इच्छापत्रात त्यांच्या संपत्तीच्या विभागवार तपशील देण्यात आला आहे. ‘आरटीईएफ’ आणि ‘आरटीईटी’ या दोन्ही संस्था मानवी सेवा आणि धर्मादाय क्षेत्रात काम करतात. त्यांच्या मालमत्तेत टाटा सन्सच्या ऑर्डिनरी आणि प्रेफरन्स शेअरचा आणि इतर आर्थिक मालमत्तांचा समावेश केला आहे.
वडील नवल टाटा यांच्याकडून रतन टाटा यांना वारसाहक्काने मिळालेल्या जुहू येथील मालमत्तेचा निम्मा हिस्सा सावत्र बंधू जिमी नवल टाटा यांना मिळणार आहे. या मालमत्तेची किंमत सुमारे १६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित मालमत्ता सिमोन टाटा आणि नोएल टाटा यांच्यात विभागली जाणार आहे. याशिवाय जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिनेही मिळणार आहेत. रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता आणि पिस्तुलासह तीन बंदुकांचा संग्रहही मिळणार आहे.
रतन टाटा यांच्या एक तृतीयांश आर्थिक मालमत्तेत बँकेच्या मुदत ठेवी, वित्तीय साधने, कलाकृती आणि घड्याळे आदींचा समावेश आहे. या मालमत्तेची अंदाजे किंमत ८०० कोटी रुपये असून, ती त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जीजीभॉय, डेना जीजीभॉय आणि टाटा समूहाच्या माजी कर्मचारी मोहिनी एम. दत्ता यांच्यात विभागली जाणार आहे. मोहिनी एम. दत्ता रतन टाटा यांच्या जवळच्या होत्या.
रतन टाटा यांच्या निधनानंतरही त्यांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही ही इच्छापत्रात देण्यात आली आहे. त्यांच्या संगोपनासाठी १२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक पाळीव प्राण्याला दरमहा ३० हजार रुपये दिले जातात. टाटा यांचे कार्यकारी सहायक शंतनू नायडू यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे.