Ready Reckoner Rate Pune | स्वप्नातील घर महागलं ! रेडिरेकनर दरात वाढ; पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवडला 6.69 टक्के वाढ; आजपासून होणार अंमलबजावणी

पुणे : Ready Reckoner Rate Pune | राज्य सरकारने रेडिरेकनर दरात सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती आजपासून लागू केली जाणार आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून मालमत्ता खरेदीदारांवर अधिक बोजा पडणार आहे. ३१ मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात ५६ हजार कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२१-२२ या आर्थिक वर्षात रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. सलग दोन वर्षे राहिलेल्या कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. त्यामुळे २०२२-२३ राज्यात रेडिरेकनरच्या दरात सरासरी ५ टक्के वाढ करण्यात आली.
त्यानंतरच्या दोन आर्थिक वर्षांत राज्य सरकारने रेडिरेकनर दरात कोणतीही वाढ केली नव्हती. गेल्या वर्षी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांचा काळ असल्याने सरकारने रेडिरेकनरच्या दरात कोणताही बदल केला नाही. मात्र, यंदा अर्थात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने रेडिरेकनर दरात सरासरी ३.८९ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रात सरासरी ६ टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रांत सरासरी ५.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडिरेकनर दर जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन आपला अहवाल पाठविला आहे. त्यासोबतच मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी, बांधकाम व्यावसायिकांच्या जाहिराती, आदींची माहिती घेऊन दर ठरविण्यात आले आहेत.
यंदा रेडिरेकनर दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास त्यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवू, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. मात्र, यात वेळेची अडचण लक्षात घेता नव्या दरांची अंमलबजावणी करण्यास विलंब होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर हा विचार राज्य सरकारने सोडून दिला.
“तीन वर्षे रेडिरेकनरचे दर स्थिर होते. यंदा वाद करण्यासाठी २०२२ ते २०२४ पर्यंतच्या दस्त नोंदणीची माहिती घेण्यात आली. त्याची सरासरी लक्षात घेऊन वाढ प्रस्तावित करण्यात आली. गेल्या वेळपेक्षा ही वाढ तुलनेने कमीच आहे”, असे रवींद्र बिनवडे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी म्हंटले आहे.
रेडिरेकनरमधील वाढ :
ग्रामीण क्षेत्र- ३.३६
प्रभाव क्षेत्र- ३.२९
नगरपरिषद-नगरपंचायत- ४.९७
महापालिका (मुंबई वगळता) – ५.९५
मुंबई महापालिका- ३.३९
राज्याची सरासरी- ३.८९
शहरांमधील वाढ:
पुणे- ४.१६
पिंपरी चिंचवड- ६.६९
ठाणे- ७.७२
मीरा भाईंदर- ६.२६
कल्याण डोंबिवली- ५.८४
नवी मुंबई- ६.७५
उल्हासनगर- ९.००
भिवंडी निजामपूर- २.५०
वसई विरार- ४.५०
पनवेल- ४.९७
सांगली मिरज कुपवाड- ५.७०
कोल्हापूर- ५.०१
इचलकरंजी- ४.४६
सोलापूर- १०.१७
नाशिक- ७.३१
मालेगाव- ४.८८
धुळे- ५.०७
जळगाव- ५.८१
अहिल्यानगर- ५.४१
संभाजीनगर- ३.५३
नांदेड वाघाळा- ३.१८
लातूर- ४.०१
परभणी- ३.७१
जालना- ४.०१
नागपूर- ४.२३
नागपूर एनएमआरडीए- ६.६०
चंद्रपूर- २.२०
चंद्रपूर म्हाडा- ७.३०
अमरावती- ८.०३
अकोला- ७.३९