Ready Reckoner Rate Pune | शहरात मेट्रो धावल्याने सदनिकांचे दर भिडले गगनाला ; मार्गिकेच्या दोन्ही बाजूंच्या ५०० मीटर परिसरातील सदनिकांच्या किमतीत मोठी वाढ

पुणे : Ready Reckoner Rate Pune | वनाझ ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेवर आता मेट्रो पूर्ण क्षमतेने धावू लागल्याने या मार्गिकेच्या दोन्ही बाजूंच्या ५०० ते १ हजार मीटर परिसरातील सदनिकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक बाजारमूल्य (रेडीरेकनर) जाहीर केल्यानंतर मेट्रो प्रकल्पामुळे पुण्यातील सदनिकांचे दर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
मेट्रो मार्गिकांलगतच्या भागातील एरंडवणा येथील कांचनगल्ली व अशोक पथ परिसर सर्वांत महागडा ठरला आहे. या भागात प्रतिचौरस फूट दर १९ हजार ४७० रुपयांवर गेला आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रभात, भांडारकर आणि विधी महाविद्यालय रस्ता परिसर आहे.
मॉडेल कॉलनी, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता ते गणेशखिंड रस्ता, घोले रस्ता, कल्याणीनगर, कर्वे रस्ता या परिसरातील दर तेजीत आहेत. कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता परिसरातील दर हे नेहमी रेडीरेकनरच्या दरात आघाडीवर असतात. त्यानुसार चालू आर्थिक वर्षासाठी जाहीर झालेल्या रेडीरेकनर दरांमध्ये मेट्रो प्रकल्पामुळे मेट्रो मार्गिकेलगतच्या भागासह मध्यवर्ती पेठांचा भाग आणि मेट्रोचे जाळे विस्तारणाऱ्या उपनगरांमध्येही सदनिकांचे दर वाढले आहेत.
वनाझ ते गरवारे कॉलेज या दरम्यान सर्वात आधी मेट्रो धावू लागल्याने या मार्गालगत असलेल्या प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील जमिनीचे दर वाढले आहेत. गेल्या वेळी विधी महाविद्यालय रस्त्यालगतचा कांचनगल्ली, अशोकपथ परिसर दुसऱ्या स्थानावर होता. या मार्गावरील प्रतिचौरस फुटाचा दर १५ हजार २८८ रुपयांवरून १९ हजार ४७० रुपये प्रति चौरस फुटांवर गेला आहे.
गेल्या वेळी तिसऱ्या क्रमांकावर असलेला प्रभात रस्त्यावरील काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) या भागातील प्रति चौरस फूट दर १४ हजार ३१२ रुपयांवरून १८ हजारांवर पोहोचले आहे. मेट्रो सुरू होण्याआधी कर्वे रस्त्यावरील दर सरासरी १३ हजार ८३५ रुपये होते, ते आता १४ हजार ९०१ रुपये झाले आहेत. पौड रस्त्यावरही ११ हजार ४८५ रुपये दर बदलून १६ हजार झाला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील दरही वाढल्याचे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर केलेल्या रेडीरेकनरच्या दरांवरून स्पष्ट झाले आहे.
शहरातील सर्वात महागड्या परिसरातील दर प्रति चौरस फुटांमध्ये ( रुपयांमध्ये)
परिसर २०२५ २०२४
कांचनगल्ली अशोक पथ
परिसर ( एरंडवणे) १९,४७०- १५,२८८
काशिनाथशास्त्री अभ्यंकर रस्ता १८,२२७ १४,३१२
प्रभात, भांडारकर
विधी महाविद्यालय रस्ता १७,७७१ १०,९९६
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
रस्ता ते गणेशखिंड रस्ता १७,४७२ ११,३१७
केतकर रस्ता १७,४७२ १३,१६७
मॉडेल कॉलनी १५,७३० १४,०१५
घोले रस्ता १४, ९८४ १३,११३
कर्वे रस्ता १४,९०१ १०,७५४
कल्याणीनगर १४,९९६ १३,१७८
बाणेर रस्ता १४,३९२ ११,३०१
जंगली महाराज रस्ता १४,०७९ १०,९२६
गणेशखिंड रस्ता ११, ७५० ११, ३१७