Revati Sule | सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे विवाहबंधनात; सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?

Revati Sule | Supriya Sule's daughter Revati Sule is getting married; Who is Supriya Sule's son-in-law Sarang Lakhani?

पुणे :  Revati Sule | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे हिचा विवाह नागपूरमधील उद्योगपती कुटुंबातील सारंग अरुण लखानी यांच्याशी ठरला आहे. ही आनंदवार्ता जाहीर झाल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक वर्तुळात या संबंधाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुळे कुटुंब आणि विदर्भातील उद्योगजगत यांच्यात या निमित्ताने नवे नाते जुळणार आहे.

सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत ही माहिती दिली. सारंग लखानी हे नागपूरमधील ‘विश्वराज ग्रुप’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. लखानी कुटुंब उद्योग क्षेत्रात प्रतिष्ठित मानले जाते. सारंग यांना क्रीडाक्षेत्राचीही विशेष आवड असून ते प्रगत बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांतील त्यांची सक्रियता लक्षवेधी मानली जाते.

या विवाहामुळे पुणे-बारामती आणि नागपूर या दोन प्रभावी सामाजिक-राजकीय पट्ट्यांमध्ये नवे संबंध प्रस्थापित होत असल्याची चर्चा आहे. काही राजकीय वर्तुळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हा विवाह ठरल्याचीही चर्चा रंगली आहे; मात्र याबाबत अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.

रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या असून त्यांना विजय सुळे नावाचा मुलगाही आहे. रेवती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) येथून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सार्वजनिक जीवनापासून काहीशा दूर राहिल्या असल्या तरी बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्या प्रथमच आईच्या प्रचारात सक्रिय दिसल्या होत्या. त्यांच्या साधेपणामुळे आणि शांत स्वभावामुळे त्या कार्यकर्त्यांमध्ये लवकरच लोकप्रिय झाल्या.

दरम्यान, या विवाहाच्या निमित्ताने सुळे कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून अभिनंदनपर संदेश दिले जात आहेत. विवाह सोहळ्याच्या तारखा आणि कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You may have missed