Sandeep Khardekar | कर्वेनगरमधील समर्थ पथ परिसरात पुन्हा पूरसदृश स्थिती; पावसाळी लाईन सफाईच्या कामावर क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्याकडून प्रश्नचिन्ह

sandeep khardekar

Sandeep Khardekar | पुण्यातील कर्वेनगर येथील समर्थ पथ परिसरात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र पाठवून या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.

खर्डेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसरात 2023 मध्ये झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून चिंतामणी, मोरेश्वर, राहुल कॉम्प्लेक्स, गंगानगरीसह अनेक इमारतींमध्ये पाणी घुसले होते. त्यावेळी तत्कालीन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांसह चार तास थांबून परिस्थितीचा आढावा घेतला होता.

त्यावेळी या भागात मोठ्या व्यासाची पावसाळी लाईन टाकण्याचे काम करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार काही काम झालेही, मात्र सुमारे 100 मीटरचा भाग अपूर्ण राहिल्याने यंदाही नागरिकांना त्याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून इमारतींतील विजेच्या मीटरपर्यंत पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, महापालिकेची यंत्रणा हलविल्यानंतर वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अडकलेला कचरा काढला आणि त्यानंतर तत्काळ पाण्याचा निचरा झाल्याचेही खर्डेकर यांनी नमूद केले आहे. यावरून पावसाळी लाईन सफाईच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, सफाईवर झालेला खर्च पाण्यात गेल्याची टीका त्यांनी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच येत्या पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ठोस योजना आखून पुढील तीन महिन्यांत तिची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

You may have missed