Sandeep Khardekar | खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी संदीप खर्डेकर यांच्याकडून परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन

पुणे : Sandeep Khardekar | सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की नागरिकांना मूळ गावी जाण्याचे किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा पर्यटनाला जाण्याचे वेध लागतात. ह्या काळात रेल्वेला असलेली गर्दी, प्रतीक्षा यादी बघता सामान्य नागरिक हा खासगी प्रवासी बसच्या प्रवासाला प्राधान्य देतो. मात्र नेमकी प्रवाशांची ही गरज ओळखून खासगी बस मालक प्रचंड भाडेवाढ करतात आणि ग्राहकांची पिळवणूक करताना दिसतात.
ऑनलाईन बुकिंग साठी वेबसाईट तपासली असता पुणे ते हैद्राबाद, इंदूर, बैंगलोर,नागपूर यासह विविध ठिकाणी प्रवासाला जाण्याचे दर आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते तर सुट्टीच्या काळात मे महिन्याचे हे दर दुप्पट / तिप्पट असल्याचे दिसून येते. प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात आणि सर्वज्ञात कारणांनी ह्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास धजावत नाहीत.
नागरिक अथवा स्वयंसेवी संस्थांनी थोडा आरडाओरडा केला तर जुजबी कारवाई करताना दिसतात. मात्र कडक कारवाई करून याला आळा घालण्याचा आरटीओचा कोणताही मानस दिसून येत नाही. ही परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्वरित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात याबाबत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी निवेदन दिले आहे.