Sandeep Khardekar | पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सोबतच पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे: Sandeep Khardekar | शहरात मागील दोन-तीन वर्षात पावसाने आपले रौद्र रूप दाखविले आहे. अवेळी आणि कमी वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाहायला मिळाले. यामुळे पुणेकरांना प्रचंड त्रासास तोंड द्यावे लागले २०२३ साली स्वतः मनपा आयुक्त विक्रमकुमार यांना रस्त्यावर उतरून विविध सोसायटीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या कामावर देखरेख करावी लागली होती. दरम्यान आता याबाबत भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सोबतच पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले आहे.
संदीप खर्डेकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सध्या मनपाची नालेसफाईची कामीसुरु आहेत, तसेच पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन यांची देखील सफाई सुरु आहेच. मात्र गत दोन वर्षे शहरात ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते अशाठिकाणी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.
उदाहरणार्थ प्रभाग १३ मधील मोरयाकृपा, मधुसंचय, गंगानगरी, चिंतामणी, कुमार परितोष, स्नेह म्हाडा, समर्थ पथ इत्यादी ठिकाणी प्रचंड पाणी साचले व नागरिकांचे जीवनच धोक्यात आल्याचे चित्र होते. यापुढील काळात अनियंत्रित पावसाचीच शक्यता गृहीत धरून योजना आखावी.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे अशा ठिकाणांची यादी उपलब्ध आहे. ह्या वर्षभरात त्या-त्या ठिकाणी प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याचा तपशील जाहीर करावा. तसेच ह्या वर्षी तेथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची हमी द्यावी. अद्याप काही ठिकाणी जर उपाययोजना झाली नसेल तर ती पावसाळ्यापूर्वी हातात असलेल्या दीड महिन्यात पूर्ण करावी अशी आग्रही मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.