Sanjay Raut on Devendra Fadnavis | वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध नाही ः संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

मुंबई : Sanjay Raut on Devendra Fadnavis | ”देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्त्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हा आम्ही हिंदुत्त्वाच्या मिशांना पिळ मारत देशभर फिरत होतो. वक्फच्या बिलाचा आणि हिंदूत्त्वाचा काही संबंध नाही. हे एक साधारण बिल असून, त्यात काही सुधारणा सरकार करु इच्छित आहे. या सुधारणांना फक्त देशातील मुसलमानांचाच नाहीतर संघाचाही पूर्ण पाठिंबा नाही, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक (Waqf Board Amendment Bill) आज दुपारी मांडले जाणार आहे. त्याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले की, औरंगजेबाची कबरी तोडण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेला संघानेही विरोध केला की, उगाच वातावरण खराब करू नका. आताही संघाची अशीच भूमिका आहे. या बिलाचा आणि हिंदुत्त्वाचा काही संबंध आहे का, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील काय, असा सवालही खासदार राऊत यांनी केला.
पुढे राऊत म्हणाले की, इतर सुधारणा बिलांप्रमाणे हे एक बिल आहे. या बिलाच्या संबध सरकारने आणला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यात कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपे जावे, यासाठी या बिलाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे. शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्त्ववाद मानणारी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्त्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा पाठिंबा दिला. फडणवीस असतील किंवा त्यांचे बगलबच्चे असतील, वक्फ बोर्डाच्या निमित्ताने बांग देतायेत हा मूर्खपणा आहे. हिंदुत्त्व हे हिंदुत्त्वाच्या ठिकाणी आहे.
आम्ही विरोधी पक्षात असताना भाजपने आणलेल्या कलम ३७० च्या बिलाला पाठिंबा दिला होता. तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्त्वाच्या संदर्भात होता. त्यानंतर तिहेरी तलाकच्याही बिलालाही विरोध केला नाही, कारण तो विषय गरीब महिलांच्या संदर्भात विषय होता. आता वक्फ बोर्डच्या बिलाचा विषय, हा त्यांच्या लाखो आणि कोटी रूपयांच्या जमिनीबाबत विषय आहे. भविष्यात त्या प्रॉपर्टी लाडक्या उद्योगपतींना देता येईल का, ही त्यासाठी झालेली पायाभरणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.