Sanjay Raut | राजकारणामुळे नाती तुटत नसतात, राज्याच्या हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक; संजय राऊत यांचे ‘मनसे’ विधान

मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut | उद्धव-राज ठाकरे यांच्यातील नात्यासाठी राजकीय व्यक्तीची गरज नाही, राजकारणामुळे नाती तुटत नसतात, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही अहंकार, कटुता नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. राज ठाकरे मुंबईत येऊ देत, मग चर्चा करूया. दररोज या विषयावर चर्चा करू, त्या विषयाचे गांभीर्य का घालवायचे, असा सवालही राऊतांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी आपण पुढे येण्यास तयार असल्याचे मुलाखतीत सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनींही प्रतिसाद दिल्याने दोन्ही भाऊ कधी एकत्र येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी भावना जनसामान्य व्यक्त करत असून, राज किंवा उद्धव यांपैकी कोणीच यावर अद्याप स्पष्टपणे विधान केले नाही.