Sant Namdev Maharaj Memorial | पंढरपुरात होणार संत नामदेव महाराज यांचे स्मारक; राज्य सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’

सोलापूर : Sant Namdev Maharaj Memorial | पंढरपुरमध्ये (Pandharpur) संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या स्मारक उभारणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा मिळाली असून, त्यापैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे. स्मारकासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपुरातील रेल्वेच्या १६ एकर जागेच्या मोबदल्यात राज्य सरकारकडून पालघर येथील जागा रेल्वेला देण्याचे ठरविले आहे. २०१४ पासून पंढरपुरात संत नामदेव स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. सुरुवातीला स्मारक बांधण्याचा खर्च १५ कोटी रुपये एवढा होता. परंतु, जागा उपलब्ध होत नसल्यामुळे स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची मुबलक जागा आहे. त्यापैकी काही जागा उपलब्ध होण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्या प्रयत्नाला यश आले आहे.
पंढरपुरात रेल्वेकडून मिळालेल्या जागेपैकी काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी उपलब्ध होणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. दरम्यान, पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषदेने सुरुवातीपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. दुसरीकडे राज्य सरकारनेही त्यास प्रतिसाद देत पंढरपुरातील रेल्वे बोर्डाच्या मालकीची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याला अखेर यश आल्याने नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर (Sanjay Nevaskar) यांनी समाधान व्यक्त केले. (Sant Namdev Maharaj Memorial)