Satara Accident News | भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू , एकाच सरणावर दिला अग्नी; घटनेने हळहळ व्यक्त

सातारा : Satara Accident News | वाल्मीकनगर येथे जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर दोन मोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात खटाव येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. विकास भिकू मोहिते (वय-४२) व पुष्पा विकास मोहिते (वय-३८, रा. राम मंदिराजवळ, खटाव, जि-सातारा) अशी मृतांची नावे आहेत.
खटाव येथील विकास मोहिते हे पशुधन खरेदी- विक्री आणि वाहन व्यवसाय करत होते, तर त्यांच्या पत्नी पुष्पा या गृहिणी होत्या. विकास मोहिते यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यांच्या या अपघाताने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हा अपघात गुरुवारी (दि. २०) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडला. दरम्यान, या अपघाताने खटाव गावात शोककळा पसरली असून, दुदैवी पती-पत्नीला एकाच सरणावर अग्नी देण्यात आला आहे. घडलेल्या या अपघातात ऋतुजा रोहित तोरसे (वय ३६), विजया प्रकाश तोरसे (वय ६५), आरोही रोहित तोरसे (वय ११), आर्या अरुण तोरसे (वय १५), दुसऱ्या मोटारीचा चालक जमीर इलाई आवटी हे गंभीर जखमी झाले आहेत.
अधिक माहितीनुसार, विकास भिकू मोहिते यांच्या शेजारच्या तोरसे कुटुंबातील मुलगी ताकारी येथे शिक्षण घेत आहे. तिच्या स्नेहसंमेलनाला ते आपल्या चारचाकी मोटारीतून (एमएच ४२, एएच १०४७) गुरुवारी ताकारी येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवण उरकून रात्री ११.४५ च्या दरम्यान विकास मोहिते हे मोटारीने पत्नी व इतरांसह वांगीहून गावी खटावकडे येत होते. याचवेळी जमीर इलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा महाबळेश्वर कडून कडेपूर-वांगी मार्गे सांगलीला मोटारीतून (एमएच ११ डीबी ५७९७) निघाला होता.
वाल्मिकी नगर-वांगी येथे येताच जमीरच्या गाडीने मोहिते यांच्या मोटारीला जोराची धडक दिली. या धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच मोटारीतील ऋतुजा तोरसे, संविजया तोरसे, आरोही तोरसे, आर्या तोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक जमीर इलाई आवटी हाही जखमी झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.