Satara Accident News | तीन मोटारींच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू; सहा गंभीर जखमी, सातारा जिल्ह्यातील घटना

सातारा : – Satara Accident News | वडूज-दहिवाडी रस्त्यावर झालेल्या तीन गाड्यांच्या भीषण अपघातात औंध येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ते दोघेही मित्र आहेत. या घटनेमुळे त्यांच्या औंध गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दहिवडी- वडूज रस्त्यावर प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने भरधाव मोटार चालवून त्याच्या समोर जाणाऱ्या मोटारीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर दहिवडीकडून वडूजला जाणाऱ्या मालवाहू मोटारीला समोरून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला.
या अपघातात प्रसाद सुतार, शिवम शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खौरमोडे (रा. औंध), मालवाहू गाडीतील लालासाहेब परशुराम पाटोळे, ज्योती लालासाहेब पाटोळे आणि पाठीमागून ठोकरलेल्या गाडीतील रोहन आप्पासाहेब भिसे आणि आकाश सोनबा बर्गे (रा. वडूज) हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. धनाजी आबाजी सुळे (रा. पिंपळवाडी, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली आहे.