Satara News | दुर्दैवी! कॅनॉलमध्ये बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

सातारा : Satara News | उरमोडी कॅनॉलमध्ये बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. रिया शिवाजी इंगळे (वय ५ वर्ष) आणि सत्यम उर्फ गणू शिवाजी इंगळे (वय ७ वर्ष) अशी दोघांची नावे आहेत. ही घटना खटाव तालुक्यातील शिरसवडी गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिरसवडी येथील शिवाजी नानू इंगळे यांची ही दोन मुले दररोज शिरसवडीहून गोपूजवाडा येथे शाळेत जातात. सत्यम इयत्ता दुसरीत, तर रिया अंगणवाडीत होती. नेहमीप्रमाणे ते दोघेही शाळेत गेले; मात्र शाळा सुटूनही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. त्यांनी तत्काळ मुलांना शोधायला सुरुवात केली.
कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु, मुले कुठेच सापडली नाहीत. काही वेळाने उरमोडी कॅनॉलमध्ये रियाचा मृतदेह आढळला. पण अजूनही सत्यमचा शोध लागला नव्हता. रिया सापडल्यानंतर पोलिस, ग्रामस्थ आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. अखेर दुसऱ्या दिवशी सत्यमचा मृतदेह गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारात आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ही दुर्दैवी घटना समजताच शिरसवडीसह गोपूज, गुरसाळे आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने कॅनॉलकडे धावले. आई-वडिलांचा रडण्याने नागरिकांना अश्रू अनावर झाले. गावकऱ्यांनी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेमकी कशी घडली, याची चौकशी सुरू आहे. अपघाताने ते दोघे कॅनॉलमध्ये पडले की, अन्य काही कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.