SC-HSC Exam 2026 | दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीत, वेळापत्रक जाहीर! पहिला आणि शेवटचा पेपर कधी ते जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – SSC-HSC Exam 2026 | राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता संपवणारी मोठी घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, विद्यार्थ्यांसाठी आता ‘काउंटडाऊन’ला सुरुवात झाली आहे. ही घोषणा होताच राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह आणि तयारीची नवी लहर निर्माण झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे, फेब्रुवारी ते मार्च २०२६ या कालावधीत या परीक्षा राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळांत एकाचवेळी पार पडणार असून, अंतिम पुनरावृत्तीसाठी विद्यार्थ्यांना आता सुमारे तीन महिन्यांचा महत्त्वाचा काळ हाती आला आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यापूर्वी २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच, एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षादेखील याच कालावधीत पार पडतील.
दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. तर २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षाही याच काळात घेण्यात येतील.
