School Summer Vacation | शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी, तर 15 जूनला वाजणार शाळेची घंटा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – School Summer Vacation | महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीबाबत शिक्षण विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा समारोप करून, साधारण दीड महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर १५ जून २०२६ पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.
यंदाच्या वेळापत्रकात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. दरवर्षी विदर्भातील कडाक्याचे ऊन लक्षात घेता, तिथल्या शाळा जूनअखेर सुरू व्हायच्या. मात्र, यंदा शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यासाठी एकच नियमावली लागू केली आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा आता १५ जूनलाच एकाच वेळी सुरू होतील.
उन्हाळ्याची तीव्रता अजूनही कायम असण्याची शक्यता लक्षात घेऊन, १५ जून ते ३० जून या कालावधीत शाळा पूर्ण वेळ न भरता केवळ सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना दुपारी उन्हाचा त्रास होणार नाही. १ जुलैपासून मात्र सर्व शाळा आपल्या नियमित वेळेनुसार सुरू होतील.
दरम्यान, शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, शाळांना उन्हाळी सुट्टी जरी २ मेपासून असली, तरी शिक्षकांना निकालाची कामे आणि पुढील वर्षाचे नियोजन पूर्ण करावे लागणार आहे. ज्या शाळांना उन्हाळ्याऐवजी इतर सणांना जास्त सुट्ट्या हव्या असतील, त्यांनी शिक्षण अधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त असणार नाहीत, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे.
