Share Market | शेअर बाजारात हाहाकार: सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही मोठी घसरण
मुंबई : Share Market | भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याची सुरुवात अत्यंत धक्कादायक ठरली असून आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल १५०० अंकांनी कोसळला असून, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ४५० हून अधिक अंकांनी खाली आला आहे. शुक्रवारी बाजारात जी मोठी तेजी पाहायला मिळाली होती, ती आजच्या एकाच झटक्यात पुसली गेली असून बाजाराने पुन्हा एकदा खालची पातळी गाठली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी वधारून ७७,५०० च्या वर बंद झाला होता, मात्र आज बाजार उघडताच विक्रीचा असा काही दबाव वाढला की निर्देशांकाने थेट ७६,००० ची पातळी गाठली.
या मोठ्या घसरणीमागे प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेतील अस्वस्थता आणि भूराजकीय तणाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर झाला आहे. तसेच गेल्या आठवड्यात झालेल्या तेजीनंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिल्याने शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. बँकिंग, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सना या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून, यामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या बाजारात कमालीची अस्थिरता असून खरेदीदारांपेक्षा विक्रेत्यांचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, निफ्टीने २४,००० ची महत्त्वाची पातळी ओलांडली असली तरी ती टिकवून ठेवण्यात अपयश आल्याने आता बाजाराला खालच्या स्तरावर आधार शोधवा लागणार आहे. जोपर्यंत जागतिक परिस्थिती स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारातील ही चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, किरकोळ गुंतवणूकदारांनी अशा वेळी घाईने निर्णय न घेता बाजाराच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच पुढील पाऊले उचलणे हिताचे ठरेल.
