Shihan Hussaini Death | प्रसिद्ध अभिनेते शिहान हुसैनी यांचे निधन

नवी दिल्ली : Shihan Hussaini Death | प्रसिद्ध अभिनेते, कराटे व तिरंदाजी तज्ज्ञ शिहान हुसैनी (वय 60) यांचे मंगळवारी (25 मार्च) पहाटे निधन झाले. हुसैनी रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत होते, याच दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबीयांनी फेसबुकवर त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
शिहान हुसैनी यांचे पार्थिव चेन्नईतील बेसंत नगरमधील हायकमांड येथे त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. येथे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकतील. त्यानंतर त्यांचे पार्थिव मदुराई येथे नेण्यात येईल, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हुसैनी यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
हुसैनी यांनी 1986 मध्ये कमल हासन यांच्या ‘पुन्नागाई मन्नन’ चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांनी रजनीकांत यांच्या ‘वेलईकरन’, ‘ब्लडस्टोन’ या तमिळ चित्रपटात काम केले. विजयच्या ‘बद्री’मध्ये त्यांनी कराटे प्रशिक्षकाची भूमिका केली होती. विजय सेतुपतीचा ‘काथुवाकुला रेंडू काधल’ आणि ‘चेन्नई सिटी गँगस्टर्स’ हे त्याने अभिनय केलेले त्याचे अखेरचे सिनेमे होते.
चित्रपटांत अभिनय करण्याबरोबरच त्यांनी अनेक रिॲलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. हुसैनी हे केवळ अभिनेते नव्हते, तर विविध कलांमध्ये पारंगत होते. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. चाहते समाज माध्यमांवर पोस्ट करून हुसैनी यांना श्रद्धांजली वाहत आहेत.