Shivsena On Kunal Kamra In Pune | कुणाल कामराला पुणेकराचे चोख प्रत्युत्तर! सामान्य माणसाशी नाळ जोडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यातून गौरव

पुण्यात पुन्हा एकदा ठाण्याच्या रिक्षाची जोरदार चर्चा… ‘बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए’ म्हणत ‘ठाण्याची रिक्षा सुसाट’चे झळकले फलक
पुणे : Shivsena On Kunal Kamra In Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामीकारक काव्य करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला पुणेकराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कामराच्याच शैलीत काव्य करीत एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करणारा फलक टिळक रस्त्यावर झळकला आहे. रिक्षा चालवताना एकनाथ शिंदे आणि मागे बसलेला ‘कॉमन मॅन’ असे व्यंगचित्र असलेला हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बोलनेवाले बोलते रहें, वो काम ही करता जाए !’ अशा शब्दांत शिंदे यांचा गौरव करण्यात आला आहे.
युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघ यांनी हा फलक दुर्वांकुर डायनिंग हॉलसमोर लावला आहे. ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ गाण्यांच्या ओळी लिहीत ‘शेर नजर वो आए’ असा गौरवपूर्ण उल्लेख शिंदे यांचा करण्यात आला. हिंदुत्वाचा कैवारी, चिपळूणचा महापूर, इर्शाळवाडीची दुर्घटना यामध्ये शिंदे यांनी तत्परता दाखवत थेट घटनास्थळी जाऊन केलेले कार्य, आरोग्य कक्षाच्या माध्यमातून केलेले कार्य यासह लाडकी बहीण योजना या काव्यातून मांडली आहे. काश्मीरच्या लाल चौकातील गणेशोत्सवात त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग यातून त्यांची कीर्ती ठाणेच नव्हे, तर पूर्ण देशभर असल्याचे दिसून येते, असे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे.
या संदर्भात वैभव वाघ म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी अवघ्या अडीच वर्षात मुख्यमंत्री केलेले लोकोपयोगी कार्य प्रेरणादायी आहे. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधीक चांगल्या सोयीसुविधा, योजना देण्याचे काम त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षातून लाखो गोरगरिबांना सेवा दिली. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, हिंदुत्वासाठी चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांबाबत कुणाल कामराने बदनामीकारक वक्तव्य संतापजनक आहे. कोणतेही कार्य न करणाऱ्या माणसाने शिंदे यांच्यासारख्या सर्वसामान्यांचा कैवारी असलेल्या व्यक्तीवर अवमानजनक काव्य रचणे ही विकृती आहे. कलेच्या नावाखाली अशी विकृती आपण सहन करता कामा नये. सामान्य माणसासाठी अहोरात्र झटणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा गौरव व सन्मान करणे आपले कर्तव्य आहे.”
नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा फ्लेक्स लावणारे वैभव वाघ हे पुणे जिल्ह्यात एक कल्पक आणि क्रियाशील नेतृत्व म्हणून प्रसिध्द आहेत. वंदेमातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून वाघ ह्यांनी काम पाहिले आहे. कोरोना काळात विविध संघटना आणि गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून वैभव वाघ ह्यांनी केलेल्या कामाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. ह्याच कामावर आधारित वाघ ह्यांनी लिहिलेले #व्हायरल_माणुसकी हे पुस्तक अल्पावधीतच प्रसिध्द झाले आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन ह्या विषयात देखील वाघ ह्यांचा हातखंडा आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाघ ह्यांची राज्यभर निवडणुक व्यवस्थापन ह्या विषयावर भाषणे आयोजित केली जात. आता ह्या फ्लेक्सच्या निमित्ताने पुणेकरांशी नाळ जोडला गेलेला पुण्याचा सामाजिक कामातील वाघ एकनाथ शिंदे ह्यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय की काय अशी चर्चा पुण्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.