Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा; दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | Ganesh Janmotsav Celebrated with Great Enthusiasm at Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Temple

पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश याग, अथर्वशीर्ष पठण, भजन, नगर प्रदक्षिणा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी गणेश जयंती निमित्त करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला तसेच रंगारी भवनाला फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत बाप्पाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कोहलर इंडिया कॉर्पोरेशन प्रा. लि या कंपनीचे विक्री प्रमुख सुहास कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. 

सकाळी नऊ ते दुपारी बारा या कालावधीत गणेश याग कार्यक्रम पार पडला, त्यानंतर सरस्वती भजनी मंडळाच्यावतीने भजन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत ‘बीव्हीआय ग्रुप’च्यावतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. सायंकाळी बाप्पाची पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती, यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते. ही नगर प्रदक्षिणा लक्षवेधक ठरली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून निघालेली बाप्पाची पालखी फरासखाना- तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक मार्गे दक्षिणमुखी मारुती मंदिरावरून पुन्हा मंदिरात आली.

यावेळी नगर प्रदक्षिणा मार्गावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री साडेआठ वाजता हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती झाली.  याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed