Solapur Accident News | दुर्दैवी! मुलाला शाळेत सोडायला निघाले अन् काळाने घातला घाला; आई-वडिलांचा जागीच मृत्यू

सोलापूर : Solapur Accident News | पिकअप आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात झाला. या अपघातात मुलाला शाळेत सोडायला दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना सांगोला-शिरभावी रस्त्यावर इंगळेपाटी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (25 मार्च) सकाळच्या सुमारास घडली. धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय 50) आणि पत्नी सुवर्णा धनंजय क्षीरसागर (वय 44, रा. शिरभावी, ता. सांगोला, सध्या चिंचोली रोड, सांगोला) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँक, शिरभावी येथे रोखपाल म्हणून कार्यरत होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, धंनजय क्षीरसागर यांचा मुलगा शिरभावी येथे हायस्कूलमध्ये शिकत आहे. क्षीरसागर हे सांगोल्याहून शिरभावीकडे दुचाकीवर मुलाला सोडण्यासाठी निघाले होते. पत्नी सुवर्णा क्षीरसागर या देखील त्यांच्यासोबत होत्या. इंगळेपाटी पेट्रोल पंपाच्या शेजारी अचानक त्यांची दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धंनजय व सुवर्णा क्षीरसागर या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा ब्रह्म हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मृताचे चुलत भाऊ गणेश दत्तात्रय कमलापूरकर, धोंडिराम दत्तात्रय कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना धनंजय आणि सुवर्णा क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. त्यांना तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच पती-पत्नीला मृत घोषित केले. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मुलाला सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.