Solapur Accident | दुर्दैवी! सोलापुरात भीषण अपघात; दुचाकीला धडक बसून 3 तरुणांचा मृत्यू
सोलापूर : Solapur Accident | सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास वेगात येणाऱ्या वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की तिघेही तरुण गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेच गवंडी, रोहन पोरे, बसवराज चनशेट्टी असे मृत तरुणांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघे मित्र दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
अपघातानंतर संबंधित वाहनचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला की वेगामुळे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असून आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
